पूर्व-पश्चिम जोडणीतील मोठी अडचण दूर
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 2B प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा शनिवारी यशस्वीपणे पूर्ण झाला. एमएमआरडीएने कुर्ला येथील हलाव पुलावर दोन यू-आकाराचे गर्डर बसवले.
पूल आणि मेट्रो मार्ग यांच्यात केवळ 3.5 मीटर अंतर असल्याने हे काम अत्यंत कठिण होते. विमानतळाच्या उंची मर्यादेमुळे येथे काम करताना विशेष काळजी घ्यावी लागली. प्रत्येकी 20 मीटर लांबीचे दोन यू-गर्डर 500 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या सहाय्याने उभारण्यात आले. वाहनांच्या वाहतुकीला कमी अडथळा निर्माण व्हावा म्हणून हे काम रात्री करण्यात आले. अवजड वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला तर हलक्या वाहनांना पूल वापरण्याची परवानगी होती. पहाटे चार वाजेपर्यंत गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले.
advertisement
कोणत्या भागांना ही मेट्रो
मेट्रो 2बी मार्ग डी.एन. नगर, बीकेसी, कुर्ला, चेंबूर आणि मंडाळे या भागांना जोडणार आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. एस. जी. बर्वे मार्गावरील मेट्रो स्थानक विमानतळाच्या नियमांनुसार एकाच स्तरावर उभारले जात आहे. स्थानकाचा पाया आणि खांबांचे काम पूर्ण झाले असून आता रुळ टाकणे, विद्युतीकरण आणि अन्य तांत्रिक कामे सुरू होणार आहेत.
