ॲक्वा लाईन मेट्रो अचानक थांबल्यानंतरच्या 30 मिनिटांबद्दल एका प्रवाशाने आपल्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण किस्सा शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या प्रवाशाने लिहिले की, "आज मेट्रो सांताक्रूझ आणि वांद्रे कॉलनीच्या मध्ये अचानकच थांबली. त्यामुळे आम्ही सर्व प्रवासी स्टेशनपर्यंत चालत चालत गेलो. मग आम्ही बीकेसीला जाण्यापूर्वी सुमारे 5 ते 7 मिनिटे वाट पाहिली. जवळपास आम्ही त्या मेट्रो स्थानकावर सुमारे 10 मिनिटे थांबलो. पुढचा प्रवास आमचा सामान्य होता. जेव्हा मेट्रो थांबलेली होती, तेवढ्या वेळ एक रोबोटिक आवाज आम्हाला 3 भाषांमध्ये कोणत्यातरी आपत्कालीन परिस्थितीबद्दल माहिती देत होता. पण ती नेमकी समस्या काय आहे हे आम्हाला समजतही नव्हतं आणि त्याबद्दल प्रवाशांना कोणी माहितीही देत नव्हतं. "
advertisement
"त्यामुळे सहाजिकच सर्वत्र चिंता वाढत गेली. आम्ही आमच्या स्टॉपवर उतरलो, तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारले, त्यांनाही नक्की काय झालंय याची फारशी कल्पना नव्हती. एकूण सुमारे 30 मिनिटांचा विलंब झाला. नेमकं कारण काय? कोणालाच काहीही माहिती नाही. एमएमआरडीएने आणि मुंबई मेट्रोने अशा प्रसंगी, ‘आपतकालीन’च्या घोषणा देण्याऐवजी मेट्रो चालकाला ही घोषणा करता येणार नाही का? प्रत्येक प्रवाशाला कळेल, अशा भाषेमध्ये उत्तर मिळाल्यास प्रत्येकाला किमान कळू तरी शकेल." अशी पोस्ट एका प्रवाशाने केलेली आहे. दरम्यान, मेट्रो अचानक थांबण्याचा प्रकार आज (23 मार्च- सोमवार) सकाळी घडला होता. यामुळे अनेक नोकरदारांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मेट्रो अचानक बंद पडण्याचं कारण अस्पष्ट आहे. सोमवारी सकाळी अर्धा तास मेट्रोचा खोळंबा झाल्यामुळे अनेक नोकरदारांना सकाळी ऑफिसमध्ये लेटमार्क लागला आहे. गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्यामुळे अनेक प्रवाशांवर याचा परिणाम झाला. सकाळी बीकेसी मेट्रो स्टेशनवर मेट्रो आल्यानंतर तिने पुढे तिचा सामान्य वेग पकडला असला तरी, आधीच उशीर झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. या घटनेमुळे मुंबईच्या वेगाने विस्तारणाऱ्या मेट्रो नेटवर्कमध्ये अधिक स्पष्ट आणि झटपट संवादाची गरज आहे, तसेच प्रवाशांनी प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीत पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
