नुकतेच, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घोषणा केली आहे की, मेट्रो लाईन-3 (ॲक्वा लाईन) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रभर चालणार आहे, ज्यामुळे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी येणाऱ्या प्रवाशांचा घर गाठण्याचा प्रवास अगदी सोयीस्कर आणि सुरक्षित होईल. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष विस्तारित रात्रीची सेवा 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:30 नंतर सुरू होईल आणि 01 जानेवारी 2026 रोजी सकाळी 05:55 पर्यंत सुरू राहील. 01 जानेवारी 2026 रोजी नियमित मेट्रो सेवा पुढे सकाळी 05:55 पासून पुन्हा सुरू होतील. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) स्पेशल मेट्रो सेवा पुरवणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मेट्रो रात्रभर चालवण्याचे उद्दिष्ट, प्रवाशांना फेस्टिव्हलच्या काळात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. ज्यामुळे नागरिकांना प्रवासाची चिंता न करता फेस्टिव्हलचा आनंद घेता येईल. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.
दरम्यान, 31 डिसेंबर 2025 च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची 'ॲक्वालाईन' (मेट्रो-3) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.
