दसरा नाही तर शिमगा मेळावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की सर्वसामान्य लोकांच्या सुखदुखात सहभागी व्हायचं असतं. त्यांना साथ द्यायची असते. त्यांना विश्वास द्यायचा असतो. त्यांना माहीत आहे, हे सरकार त्यांचं आहे. म्हणून लोक आमच्या पाठिशी आहेत. लोकांना न्याय देणारं हे सरकार आहे. कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं राहणारं आहे. मर्द मर्द काय? सारखं सांगावं लागतं का? अशी वेळ त्यांच्यावर आली असेल तर आम्ही काय बोलावं. आणि त्यांचा दसरा मेळावा नाही तर शिमगा मेळावा आहे. कारण, ते आमच्या नावाने, पंतप्रधान मोदी यांच्या नावाने सरकारच्या नावाने नेहमी शिमगा करत असतात. शिव्याशाप देत असतात. त्यामुळे त्यांना दसऱ्याला मेळावा न घेता, शिमग्याला घ्यायला हवा. उद्या तुम्हाला हेच पाहायला मिळणार, अशी टीका मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
advertisement
शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ धडाडणार
मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. यासाठी जय्यत तयारीदेखील करण्यात आली आहे. वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात आले आहे. महिलांना बसण्यासाठी स्टेजच्या समोर विशेष व्यवस्था असेल. तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
वाचा - मुंबईचे डबेवाले परंपरा मोडणार, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला गैरहजर राहणार, कारण...
आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचं शक्तीप्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दोन लाख लोक येणार असल्याचा अंदाज व्यक्त आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरील मेळाव्यापेक्षाही विशाल आणि यशस्वी व्हावा, यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे.
