स्वस्त आणि ताजी मासळी आता एकाच छताखाली
मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार उभारण्याच्या सुमारे 138 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि उपनगरातील मासळी व्यापार अधिक मजबूत होणार असून 2,816 मच्छीमारांना थेट लाभ मिळणार आहे.
आधुनिक सुविधा, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया केंद्रे, स्वच्छता व्यवस्था आणि निर्यातक्षम पायाभूत सुविधा यांचा या बाजारात समावेश असेल. त्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या मासळीला योग्य दर मिळण्यास मदत होईल.
advertisement
या प्रकल्पासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित संघटनांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
मच्छीमारांना थेट विक्रीची संधी मिळणार का?
नवीन बाजारामुळे व्यापार अधिक संघटित होईल आणि मध्यस्थांची संख्या कमी होईल. तसेच मच्छीमारांना थेट विक्रीची संधी मिळेल. बाजार परिसरात कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक सुविधा उभारल्या जाणार आहेत. मच्छीमार कुटुंबांसाठी पोषण सहाय्य योजनेचाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि मासळीची वाढती मागणी लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मरोळ येथील हा घाऊक मासळी बाजार प्रकल्प मत्स्य व्यवसायासाठी मोठा बदल घडवून आणणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
