पनवेल- कन्याकुमारी एन एच 66 म्हणून नव्याने ओळखला जाणाऱ्या ह्या मुंबई- गोवा महामार्गाची बिकट परिस्थिती झाली आहे. या रस्त्याच्या काँक्रिटला भेगा पडल्या आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी थेट काँक्रिटमधूनच शिगा बाहेर आल्यामुळे भरधाव वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवलीपासून चिपळूणपर्यंत अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत आणि शिगा बाहेर आल्या आहेत. या महामार्गाच्या शेजारी असणार्या अनेक रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
advertisement
संपूर्ण रस्त्याच्या कामाची गती, सतत वाहतूक कोंडी, अनेक ठिकाणी सुरू असलेले सततचे बांधकाम यामुळे वाहतुकदारांना त्रास सहन करावा लागत आहे. जेव्हापासून रस्त्याचे काम सुरू झाले आहे, तेव्हापासून रस्त्याच्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रस्त्याच्या कामामुळे करण्यात आलेल्या ड्रायव्हर्जनमुळे रात्रीच्या अपघातांची संख्या अधिकाधिक वाढली आहे. शिवाय, रस्त्याच्या कामामुळे धुळ सुद्धा मोठ्या प्रमाणावर उडत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या आहेत. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगर आणि वळणे असल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. कासवगतीने सध्या पनवेल- कन्याकुमारी एन एच 66 महामार्गाचे काम सुरू आहे.
दरम्यान, पनवेल- कन्याकुमारी एन एच 66 महामार्गावर बाहेर आलेल्या शिगांमुळे वाहन चालकांना वाहन जरा सावधगिरीने चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रस्त्याच्या या समस्येकडे आतातरी कोकणातले स्थानिक नेते, राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम रखडलेले आहे. त्यावरूनही प्रवाशांकडून प्रत्येक गणेशोत्सवात आणि शिमग्याच्या वेळी तीव्र संताप व्यक्त केला जातो. संपूर्ण महामार्गाचे काम अद्याप पूर्ण नाही होत, तेच रस्त्याला थेट भेगा पडल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
