नव्याने टाकण्यात आलेल्या 750 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिमच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता खंडित होणार असल्याची घोषणा केली आहे. जलवाहिनीच्या जोडणीच्या कामाला शनिवारी, 28 मार्च रोजी रात्री 11:00 वाजेपासून सुरूवात होणार असून रविवार, 29 मार्च रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत, तब्बल 16 तास हे काम चालू राहणार आहे. पाणी बंद राहणार असल्यामुळे अनेक मुंबईकरांचे या काळामध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस पुरेल इतका पुरेसा पाणीसाठी भरून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केलेले आहे.
advertisement
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद रोड आणि आर. के. पाटकर रोडवर महापालिकेकडून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. पाली हिल जलाशयातील पाणीपुरवठ्याची पातळी सुधारण्यासाठी आणि आसपासच्या परिसरातील पाणीवितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा मुख्य उद्देश हा या प्रकल्पामागील असणार आहे. रविवार, 29 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याच्या कालावधीत, एच-वेस्ट वॉर्डमधील अनेक भागांमध्ये पूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर इतर भागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहील. तर, संपूर्ण खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम, तसेच बाजार रोड, जैन मंदिर रोड आणि डी'मोंटे रोडसह वांद्रे पश्चिममधील काही भागांना त्यांच्या नियमित सकाळच्या वेळेत (पहाटे 04:00 ते सकाळी 08:30) पूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
वांद्रे पश्चिममधील हिल रोड, पेरी रोड, मॅन्युएल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्र्यूज रोड, सेंट पॉल रोड, डॉमिनिक रोड, आर. के. पाटकर रोड, नवीन आणि जुनी कांतवाडी, रणवार गाव, वरोडा रोड, कार्टर रोड, पाली माला रोड, चिंबई गाव, शर्ली गाव, राजन गाव, माला गाव आणि पाली गाव यांसह अनेक भागांमधील पाणीपुरवठा सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 या नियमित वेळेत बंद राहील. खार दांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, गाझधर बंधाऱ्याचा काही भाग आणि खार पश्चिमच्या काही भागांमध्ये संध्याकाळच्या वेळेत पाणीपुरवठा (संध्याकाळी 05:30 ते रात्री 10:00) कमी दाबाने होणार आहे. याव्यतिरिक्त, शनिवार, 28 मार्चच्या रात्री 10:00 ते मध्यरात्री 01:00 च्या दरम्यान डॉ. आंबेडकर रोड, पाली गावठाण, पाली हिल आणि वांद्रे व खार पश्चिमच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील.
बीएमसीने ज्या भागांना पाणी पुरवठा होणार नाही, अशा भागातल्या नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा भरून ठेवण्याचे आणि जपून पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना पुढील चार ते पाच दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
