मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) शरद पवार गटाने ठाकरे बंधूंशी युती केली आहे. मात्र जागावाटपावरून झालेल्या नाराजीनाट्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. राखी जाधव यांनी या निवडणुकीत 52 जागांच्या उमेदवारांची यादी पक्षाकडे दिली होती. युती किंवा आघाडीत पक्षाला कमी जागा मिळत असल्याने त्या नाराज होत्या. यासंदर्भात बोलून देखील वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले नाही अशी त्यांची नाराजी आहे. घाटकोपरमधून राखी जाधव यांना भाजपकडून महापालिकेची उमेदवारी मिळाली आहे.
advertisement
पक्ष सोडल्यानंतर राखी जाधव यांची पहिली प्रतिक्रिया
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राखी जाधव यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत राजीनामा दिल्याचे कारण सांगितले आहे. राखी जाधव म्हणाल्या, मतदारसंघातील विकासासाठी हा निर्णय घेतला जो विकास मुंबईत होतोय असाच विकास घाटकोपर मध्ये व्हावा म्हणून प्रवेश केला आहे. पराग शहांसोबत संघटित व्हावं असं वाटलं कारण आपण राजकारण विकासासाठी करत आहे. अपेक्षित कामे व्हावीत म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.
शरद पवारांची साथ राखी जाधव यांनी का सोडली?
भाजपच्या माध्यमातून होणाऱ्या विकासात सहभागी होण्यासाठी निर्णय घेतला आहे. कार्यकर्ता नेत्याकडे व्यक्त होतो. मात्र नेता दुर्लक्षित करतो तेव्हा लक्षात येतं की चुकतंय, असे म्हणत राखी जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे.
प्रविण दरेकर काय म्हणाले?
राखी जाधव यांच्या उमेदवारीवर प्रविण दरेकर म्हणाले, उमेदवारीसाठी कुणी येत नाही, विकासाचे राजकारण पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस करतात. राखी जाधव जमिनीवरील कार्यकर्ता आहे. विकास करायचा असेल तर देवेंद्रजीसोबत काम करावं असं त्यांना वाटलं . शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी प्रवेश केला. ज्या पक्षात चांगले लोक आहेत ते भाजपत येत आहे. मोदी, फडणवीस आणि राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे ते भाजपत येत आहेत.
