कानपूर, 31 ऑगस्ट : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 चे मून लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरवले आहे. इस्रोचे हे अभियान यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ यांना फोन करुन संपूर्ण देशवासियांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. तसेच परदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर स्वत: इस्त्रो येथे जाऊन सर्व शास्त्रज्ञांच्या टीमची भेट घेत पुन्हा त्यांचे अभिनंदन करत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
advertisement
इस्त्रोच्या या कामगिरीमुळे भारताच्या या विक्रमाचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. यातच आणखी एक बातमी समोर आली आहे. एका रस्त्याला इस्त्रो प्रमुखांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या टीमने केलेल्या या कामगिरीनंतर संपूर्ण देशाने त्यांचे अभिनंदन केले.
उत्तरप्रदेशातील कानपूरमधील एका रस्त्याला इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांचे नाव देण्यात येणार आहे. कानपूर महापालिकेच्या सभागृहाने याला सहमती दर्शवली आहे. तसेच कानपूरच्या बर्रा बायपासवरुन कर्रही पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला इस्त्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे दिले जाणार आहे. मात्र, सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यावरुनच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ट्विट करून सरकारला प्रश्न उपस्थित केला आहे.
रस्ता बनवण्यासाठी बजेटही जारी करण्यात आले आहे. लवकरच हा रस्ता तयार होईल आणि त्याचे नामकरण इस्त्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्या नावाने केले जाईल.
कानपुर दक्षिणचा हा प्रमुख रस्ता आहे, जो दक्षिणचे लोकही वापरतात. दररोज या रस्त्यावरुन जवळपास 2 ते 3 लाख लोक प्रवास करतात. याकडे कुणाचेच लक्ष जात नव्हते. हा रस्ता कानपूरच्या महाराजपूर विधानसभेच्या अंतर्गत येतो. विशेष म्हणजे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार विधानसभा अध्यक्ष सतीश महाना हे आहेत. मात्र, तरीसुद्धा या रस्त्याची दुरावस्था होती आणि आजपर्यंत हा रस्ता बनला नाही. मात्र, आता जेव्हा इस्त्रो प्रमुख यांचे नाव या रस्त्याला देण्यात यावे, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता या रस्त्याचेही नशिब पालटणार आहे.
