उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात आज दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. फाफामऊ येथील चांदपूर येथील एका कोल्ड स्टोरेजचे छत अचानक पत्त्यासारखी कोसळल्याने तेथे काम करणाऱ्य मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, छत कोसळण्यापूर्वी परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचाव कार्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, फाफामऊ येथील हे कोल्ड स्टोरेज चांदपूरच्या एका माजी आमदाराच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. नेहमीप्रमाणे मजूर तिथे आपले काम करत असताना अचानक भिंत कोसळली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार छत कोसळण्यापूर्वी मोठा स्फोटाचा आवाज झाला आणि काही क्षणातच संपूर्ण छप्पर मजुरांच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या घटनेमुळे मजुरांना बचावासाठी बाहेर देखील येता आले नाही.
कोल्ड स्टोरेज कोणाच्या मालकीचे?
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तातडीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 5 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण दबले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये ही दुर्घटना घडली ते समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्र अन्सार अहमद पहलवान यांचे आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री योगींचे निर्देश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांच्या प्रती त्यांनी संवेदना व्यक्त करत जखमींवर योग्य उपचार करण्याचे आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
