चंडीगढ, 5 ऑक्टोबर : जर तुम्ही चंदीगढमध्ये पेट्रोल-डिझेलवर चालणारी कार किंवा दुचाकी घ्यायचा विचार करत असेल, ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला नवीन वाहन खरेदी करता येणार नाही. चंडीगढ प्रशासनाच्या ईव्ही पॉलिसी लागू झाल्याने सणाला नवीन पेट्रोल किंवा डिझेल वाहन खरेदी करण्याची तुमची योजना अयशस्वी होऊ शकते. यामुळे फक्त वाहन खरेदीदारांमध्येच नव्हे तर शहरातील ऑटोमोबाईल कंपन्यांमध्येही खळबळ उडाली आहे.
advertisement
चंदीगढ प्रशासनाने सप्टेंबर 2022 मध्ये इलेक्ट्रीक वाहन पॉलिसी लागू केली होती. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनाला चालना देऊन शहराला आणखी चांगले बनवण्याची ही योजना आहे. याच अंतर्गत पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी एक कोटा ठरवून देण्यात आला होता. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता ईव्ही पॉलिसीमुळे सणाला पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांसह ऑटोमोबाईल कंपन्यांनाही धक्का बसला आहे.
होंडाने काय म्हटले -
न्यूज 18च्या टीमने यावेळी चंदीगढ येथील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी होंडामध्ये जाऊन याबाबत माहिती घेतली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्यावर इलेक्ट्रिक वाहन धोरण लादले जात आहे. हे धोरण फक्त चंदीगडमध्ये राबवले जात आहे. याअंतर्गत शहरातील दुचाकींच्या नोंदणीचा कोटा केवळ 400 राहिला आहे. तसेच तोसुद्धा या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर कोणतीही दुचाकी, मग ती बाईक असो की अॅक्टिव्हा, या वाहनांची नोंदणी चंदिगडमध्ये होणार नाही.
ऑटोमोबाइल सेक्टरसाठी हा निर्णय घातक -
ट्राई सिटीमध्ये चंडीगढ व्यतिरिक्त पंचकूला आणि मोहालीपण येते. मात्र, फक्त चंडीगढमध्ये हे धोरण लागू करण्यात येत आहे. याच्याशी संबंधित व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय त्यांच्यासाठी घातक असेल ज्यामुळे पूर्ण ऑटोमोबाईल कंपन्या उध्वस्त होतील. मागे काही दिवसांपूर्वी ऑटोमोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींची प्रशासनासोबत बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. ईव्ही पॉलिसीनुसार नॉन इलेक्ट्रिक बाइक्सचा कोटा संपत आहे. त्यामुळे सेक्टर-17 मधील नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने (RLA) पेट्रोल बाईकची नोंदणी बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
किती कोटा बाकी -
आरएलएने असेही म्हटले आहे की, यावर्षी पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या नोंदणीचा कोटाही केवळ 1802 राहिला आहे. हा कोटा नोव्हेंबरपर्यंत संपणार आहे. 2023-24 या वर्षाच्या ईव्ही धोरणाच्या उद्दिष्टानुसार, शहरात 6202 पेट्रोल दुचाकींची नोंदणी करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानंतर पेट्रोल बाईकची नोंदणी थांबेल आणि फक्त इलेक्ट्रिक बाइकची नोंदणी केली जाईल.