राजस्थानच्या राजधानीत एक अनोखी घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ शेअर झाला आहे. यात अपहरणकर्त्याने 14 महिन्यांपूर्वी ज्या लहान मुलाचं अपहरण केलं होतं, तो मुलगा अपहरणकर्त्याला अटक होताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. लहानगा रडताना पाहून आरोपी त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तोही रडू लागला. या अनोख्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
14 महिन्यांपूर्वी जयपूरमधून एका मुलाचं अपहरण झालं होतं. 14 महिन्यांनंतर पोलिसांनी मुलासह आरोपीला ताब्यात घेतले. तनुज चाहर असं या आरोपीचं नाव आहे. जेव्हा मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्याची वेळ आली तेव्हा तो अपहरणकर्त्या व्यक्तीला सोडण्यास तयार नव्हता. पोलिसांनी आरोपीजवळ असलेल्या मुलाला जबरदस्तीने त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. लहान मुलाला रडताना पाहून आरोपीदेखील रडू लागला.
गेल्या वर्षी 14 जून रोजी जयपूरच्या सांगानेरमधल्या 11 महिन्यांच्या पृथ्वी उर्फ कुक्कूचं अपहरण झालं होतं. 14 महिन्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून, त्याच्याकडून मुलाला ताब्यात घेतलं. या दरम्यान मुलाला सुपूर्द करण्याची वेळ आली, तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. हे दृश्य पाहून पोलीस कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.
सुमारे 14 महिने कुक्कूचं अपहरण झालं. तेव्हापासून तो आरोपीच्या कैदेत होता; पण त्याने मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. तो मुलाची काळजी घेत होता. त्याला नवीन कपडे, खेळणी देत होता. तनुज चाहर हा उत्तर प्रदेश पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल होता. तो सध्या निलंबित आहे.
मुलाचं अपहरण केल्यावर त्याने वेश बदलला होता. दाढी-मिशी वाढवून भगवं वस्त्र परिधान करून तो साधू बनून राहत होता; पण पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जयपूर पोलिसांनी त्याला अलीगड इथे अटक केली. सध्या हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.