वडिलांचं निधन अन् संकटांचा डोंगर, लेकीनं मसाला पापड विकून सावरलं घर
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वडिलांचं अकाली निधन झाल्यानंतर चित्राली मसाला पापड विकून घराची जबाबदारी सांभाळत आहे.
advertisement
1/7

घरचा कर्ता पुरुष अकाली गेल्यावर कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशीच काहीशी परिस्थिती <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> चित्राली भोसले या मुलीवर आणि तिच्या कुटुंबावर ओढावली होती. वडिलांच्या निधनानंतर घरातील मोठी मुलगी म्हणून सगळी जबाबदारी चित्रालीवर येऊन पडली. पण या सर्व परिस्थितीला तिनं हिंमतीनं तोंड दिलं. मसाला पापडचा स्टॉल चालवून ती कुटूंब तर सांभाळतेय पण नोकरीपेक्षाही जास्त कमावतेय.
advertisement
2/7
चित्राली भोसले ही एका सामान्य मराठी कुटुंबातील मुलगी असून कुर्ला इथे राहते. तिच्या वडिलांचं अकालीन निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी चित्रालीवर येऊन पडली. पडेल ते काम करून कुटुंबाला पुन्हा उभं करण्याचा ध्यास तिनं घेतला. चित्रालीला दोन भावंड आहेत. तेही तिला होईल तेवढी मदत करतात. तर आई एका रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करते.
advertisement
3/7
चित्राली सुरुवातीला 7 ते 8 वर्ष एका नामवंत रुग्णालयात परिचारिकेचं काम करत होती. पण कालांतराने ती नोकरी गेली. त्यानंतर तीनं टेलिकॉलर म्हणूनही नोकरी केली. पण तिथेही तिला हवा तेवढा पगार मिळत नव्हता.
advertisement
4/7
घरची परिस्थिती बिकट असल्यानं तिला दुसरा पर्याय शोधावा लागणार होताच. नवीन नोकरी शोधण्यापेक्षा आपलं स्वत:चं असं काहीतरी सुरु करण्याचा तिनं निर्णय घेतला अन् मसाला पापडचा स्टॉल सुरु केला.
advertisement
5/7
कुर्ला पश्चिम येथे दत्तगुरु लेनच्या समोर चित्रालीनं मसाला पापडचा स्टॉल सुरू केला. मसाला पापड सोबतच तिच्या स्टॉलवर वेफर्स पावही तितकाच खास मिळतो. त्यामुळे ग्राहकांची गर्दी या ठिकाणी नेहमीच असते. चित्रालीचा स्टॉल हा संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत असतो. तसेच चित्रालीच्या स्टॉलवर साधा मसाला पापड, चिज मसाला पापड, वेफर्स पाव असे बरेच पदार्थ मिळतात.
advertisement
6/7
"मुलींनी घराबाहेर पडलं पाहिजे, न घाबरता स्वत:चा व्यवसाय सुरु केला पाहिजे. आपण चुकीचं काही करत नाही याची आपल्याला खात्री असते. मग का कोणाची लाज बाळगायची. कोणताच व्यवसाय हा लहान नसतो. आपले विचार तेवढे मोठे हवेत. मराठी मुलींनी तर हमखास व्यवसायात उतरायला हवं," असं मत चित्रालीनं व्यक्त केलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, चित्राली किंवा तिच्या सारख्या कित्येक मुली व्यवसायात उतरण्याची, आपलं स्वत:चं असं काहीतरी सुरु करण्याची धडपड करतायेत हे कौतुकास्पद आहे. चित्राली म्हणाली तसं मुलींनी न घाबरता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. चित्रालीचा प्रवास हा अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. (मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
वडिलांचं निधन अन् संकटांचा डोंगर, लेकीनं मसाला पापड विकून सावरलं घर