आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आहे. अलीकडेच वनराज आंदेकर हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं. याच पार्श्वभूमीवर ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात आयुषची नेमकी काय भूमिका होती? त्याची हत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र केवळ तो गणेश कोमकरचा मुलगा असल्यानेच हा बदला घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
दरम्यान, आता या सगळ्या प्रकरणात एका महिलेचं कनेक्शन समोर आलं आहे. आयुषची हत्या होण्याच्या चार दिवस आधी भारती विद्यापीठ पोलिसांनी आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली होती. आंदेकर टोळी असा काहीतरी मोठा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी आंदेकर टोळीला शस्त्र पुरवण्याच्या आरोपाखाली दत्ता बाळू काळे याला अटक केली होती. त्याने भारती पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकी केल्याची माहिती समोर आली होती. दत्ता काळेला अटक केल्यामुळे आंदेकर टोळीचा प्लॅन उधळला असा समज पोलिसांचा झाला. मात्र नाना पेठेत आयुष हत्या झाल्यानं संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आता या प्रकरणात एका महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराज आंदेकर खुनाचा बदला घेण्यासाठी बाळू काळे याने रेकी केली होती. त्याला आंबेगाव पठार परिसरात एका महिलेनं भाड्याने राहायला घर उपलब्ध करून दिलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही व्यक्तीने आपल्या मालकीच्या घरामध्ये किंवा मालमत्तेमध्ये इतरांना राहण्यासाठी जागा दिल्यास त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. अशी माहिती न दिल्यास हे पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन ठरते आणि कारवाई करण्यात येते. याचा कारणामुळे काळे याला घर भाड्याने देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.