नेमकी घटना काय?
शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शुभांगी राऊत या आपल्या कुटुंबीयांसमवेत शेतात वाटाणा आणि मसूर भरडण्याचे काम करत होत्या. धान्यभरड यंत्र वेगाने सुरू असताना, अचानक शुभांगी यांनी डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस यंत्रामध्ये अडकले. यंत्राचा ओढा इतका प्रचंड होता की, त्या क्षणात यंत्राकडे ओढल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
advertisement
वाढदिवसाचा दिवस ठरला शेवटचा दिवस
कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या आशेने त्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात हलवलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शनिवारीच शुभांगी यांचा ४१ वा वाढदिवस होता. सोशल मीडियावर आणि घरात त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असतानाच ही बातमी धडकली आणि संपूर्ण कुरंगवडी गावावर शोककळा पसरली.
लष्करी कुटुंबावर आघात
शुभांगी या माजी सैनिक रमेशदादा राऊत यांच्या सून आणि निवृत्त सैनिक नीलेश राऊत यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. राजगड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून हवालदार मंगेश कुंभार पुढील तपास करत आहेत. आनंदाचा दिवस असा दुःखात बदलल्याने परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत.
