महापालिकेच्या विकास आराखड्यात आणि सर्वंकष वाहतूक आराखड्यात चार प्रमुख बोगद्यांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये तळजाईखालून बोगदा खोदून सातारा रस्ता आणि सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे मार्ग) एकमेकांना जोडणे, तसेच सुतारदरा-पंचवटी बोगदा तयार करून पाषाण, कोथरूड आणि पंचवटी परिसर एकमेकांशी जलद आणि सुरक्षितपणे जोडणे यांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गांवर आणखी दोन बोगदे प्रस्तावित असून, शहरातील वाहतूक सुरळीत होईल, असा महापालिकेचा अंदाज आहे.
advertisement
प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता संदीप पाटील, उपअभियंता पवन मापारी, कनिष्ठ अभियंता संभाजी कवठे आणि सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या बोगद्यांच्या मार्गांची बारकाईने पाहणी केली आहे. सध्या सुतारदरा आणि कोथरूड परिसरातून पंचवटी-पाषाण भागात जाण्यास दोन मार्ग आहेत. चांदणी चौक मार्गाने जाण्यासाठी सुमारे 11 किलोमीटरचे अंतर असून आठ चौक ओलांडावे लागतात आणि त्यासाठी 40 ते 50 मिनिटे लागतात; तर सेनापती बापट मार्गाने जाण्यासाठी 10 किलोमीटर अंतर असून 50 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो.
महापालिकेच्या अहवालानुसार, प्रस्तावित सुतारदरा-पंचवटी बोगदा तयार झाल्यानंतर सुमारे दीड किलोमीटर अंतर फक्त 5 ते 10 मिनिटांत पार करता येईल. त्याचप्रमाणे तळजाई-पाचगाव बोगदा सातारा रस्ता आणि सिंहगड रस्ता जोडेल. सध्या सातारा रस्त्याच्या मार्गाने धनकवडी, कात्रजमार्गे नवले पुलावरून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी नऊ चौक ओलांडावे लागतात, जे 40 ते 50 मिनिटे घेतात. स्वारगेट मार्गाने जाण्यास सुमारे 7.5 किलोमीटरचे अंतर असून 10 चौक ओलांडून पोहोचता येते, त्यालाही 40 ते 50 मिनिटांचा कालावधी लागतो.
या प्रस्तावित बोगद्यांच्या कामानंतर, या मार्गांवरचे अंतर केवळ 2.5 किलोमीटर राहील आणि पाच ते दहा मिनिटांत सहज कापले जाऊ शकते. त्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि शहराच्या विविध भागांमध्ये संपर्क अधिक जलद साधता येईल.