डिलिव्हरीच्या नावाने रचला सापळा
परळ येथील रहिवासी असलेल्या प्रियंका शहा (वय ४१) यांनी एका वेबसाइटवरून कपड्यांची ऑर्डर दिली होती. काही दिवसांनी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण डिलिव्हरी कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवले. "तुमच्या ऑर्डरच्या पेमेंटमध्ये काही तांत्रिक त्रुटी आहे, ती पूर्ण केल्याशिवाय पार्सल मिळणार नाही," असे सांगून आरोपीने प्रियंका यांचा विश्वास संपादन केला.
advertisement
आरोपीने पेमेंट पूर्ण करण्यासाठी प्रियंका यांना एक QR कोड पाठवला आणि काही पैसे बँक ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. एकदा पैसे कापले गेल्यानंतर, "तांत्रिक चुकीमुळे जास्त पैसे कापले गेले आहेत, ते रिफंड करतो" असे सांगून आरोपीने त्यांना पुन्हा पुन्हा व्यवहार करण्यास लावले. रिफंडच्या आमिषापोटी प्रियंका यांनी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवले. अखेर, जेव्हा त्यांच्या खात्यातून एकूण ९८ हजार रुपये गायब झाले, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे समजताच प्रियंका यांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार केली. यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन शॉपिंग करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेला QR कोड स्कॅन करू नका किंवा बँक तपशील शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
