नेमकी घटना काय?
आरिझ हा एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होता आणि त्याने राष्ट्रीय स्तरावर खेळाचे प्रदर्शन केले होते. नुकतीच १२ वीची परीक्षा संपवून तो कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केरळला सहलीसाठी गेला होता. रविवारी सकाळीच तो सहलीवरून पुण्यात परतला. सायंकाळी मित्राला भेटण्यासाठी तो आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडला. मात्र, मित्राला भेटण्याआधीच महंमदवाडी हद्दीतील क्लाऊड ९ परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
या भीषण धडकेत आरिझ रस्त्यावर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वानवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा अशा प्रकारे अंत झाल्याने कोंढवा आणि महंमदवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टँकर चालक रवींद्र दनाने याला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ आणि वानवडी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पुण्यातील उपनगरांमध्ये टँकरच्या वाढत्या वेगामुळे होणारे अपघात आता चिंतेचा विषय ठरत आहेत.
