पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाजवळ अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणार आहेत. या जनसमुदायाच्या गर्दीमुळे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने पिंपरी चौकातील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (६ डिसेंबर) दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.
advertisement
या मार्गांवर असेल प्रवेशबंदी:
या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे येणाऱ्या अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक सामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. चिंचवड येथील महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यानच्या सेवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना प्रवेश मिळणार नाही. याऐवजी वाहनचालकांनी डी-मार्ट इन-ग्रेडसेपरेटर मार्गाचा वापर करावा.
तसेच, कासारवाडी येथील नाशिक फाटा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यानच्या सेवा रस्त्यावरूनही वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर इन तसेच खराळवाडी येथील एच. पी. पेट्रोल पंप समोरून ग्रेडसेपरेटर मार्गे प्रवास करावा.
पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील स्व. इंदिरा गांधी पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणारा मार्गही बंद राहील. प्रवाशांनी मोरवाडी चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. याशिवाय, नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान प्रवेशबंदी असल्याने, वाहनचालकांनी एच.ए. कॉर्नर बस थांबा ते मासुळकर कॉलनी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
या वाहतूक बदलांमुळे होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
