नेमकी घटना काय?
निरगुडसर येथील वळसे मळा परिसरात शीला सोनु वळसे पाटील या आपल्या बंगल्यात एकट्याच वास्तव्यास आहेत. २१ मार्च रोजी वाफगाव येथे यात्रेनिमित्त त्या दोन दिवसांसाठी आपल्या माहेरी गेल्या होत्या. घर बंद असल्याची खात्री करून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला.
शनिवारी (दि. २१) सायंकाळी जेव्हा शीला वळसे पाटील आपल्या घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. संशयास्पद वाटल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि कपाटाचे लॉकर तोडलेले होते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले २८ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. भरवस्तीत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याने निरगुडसर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. एकटी महिला राहत असलेल्या घराची रेकी करून ही चोरी करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
