नेमकं काय घडलं?
जुबेर अहमद रशिद शेख (वय ३५) हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. रात्री साडेअकराच्या सुमारास ते विकास काशिनाथ धोत्रे याच्या घरी जेवणाची ऑर्डर घेऊन गेले होते. मात्र, काही कारणांमुळे डिलिव्हरीला थोडा उशीर झाला. याच गोष्टीचा राग मनात धरून विकास धोत्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी जुबेर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
बांबूने सपासप वार आणि पोलिसांची एन्ट्री
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी माणुसकीला तिलांजली देत जुबेर यांना लाकडी बांबूने आणि हाताने बेदम मारहाण केली. जुबेर मदतीसाठी ओरडत असतानाही ही टोळी त्यांना मारत राहिली. सुदैवाने, त्याच वेळी आंबेगाव पोलीस ठाण्याचे मार्शल गस्तीवर होते. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींचे धाबे दणाणले आणि तिघे साथीदार तिथून पसार झाले. पोलिसांनी मुख्य आरोपी विकास धोत्रेला ताब्यात घेतले आहे.
डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जुबेर शेख यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार लोहार पुढील तपास करत आहेत. १०-१५ मिनिटांच्या उशिरासाठी एका कष्टकरी माणसाला अशा प्रकारे मारहाण होणे, हे पुणेकरांच्या सुसंस्कृतपणाला धक्का लावणारे आहे.
