वाकीबुद्रुक आणि बिरदवडी येथे दोन मृत्यू
वाकीबुद्रुक येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात यश आले नाही. त्याचप्रमाणे, बिरदवडी येथेही विसर्जनाच्या वेळी एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांमुळे संबंधित गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
उत्तर प्रदेशातील तरुण बुडाला
advertisement
वाकी खुर्द येथे भामा नदीत वीस वर्षाचा कोयाळी येथील एक विद्यार्थी तसेच 19 वर्षाचा उत्तर प्रदेशातील तरुण बुडाला आहे. शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत 45 वर्षाचा पुरुष बुडालेला आहे. तर बिरदवडी येथील विहिरीतही एक तरुण बुडालेला आहे. भामा नदीतील बुडालेल्या तरुणांना रेस्क्यू पथकाने शोध मोहीम घेऊन काढण्याचा प्रयत्न केला असून त्यातील एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे.
शेलपिंपळगाव येथे दोन तरुण बेपत्ता
शेलपिंपळगाव येथे विसर्जनादरम्यान दोन तरुण पाण्यात वाहून गेले आहेत. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक या बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहे. मात्र, त्यांना शोधण्यात अद्याप यश आलेले नाही.
दरम्यान, आनंद आणि उत्साहाच्या गणेशोत्सवाला या दुर्दैवी घटनांमुळे गालबोट लागले आहे. पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना विसर्जन करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.