नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील गुलमोहर कॉलनीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र केशवनगरमधील गुरुकृपा सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत जमले होते. आरोपी सोनू उर्फ सोन्या मुंडे याच्याकडे बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल होते. हे सर्व तरुण पिस्तूल हातात घेऊन एकमेकांना दाखवत होते आणि फोटो-व्हिडिओ काढत मस्करी करत होते.
मस्करी करत असताना सोन्या मुंडे याने पिस्तूल त्या अल्पवयीन मुलाच्या दिशेने रोखले. दुर्दैवाने, पिस्तुलाचा चाप ओढला गेला आणि गोळी थेट मुलाच्या कंबरेत शिरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला पाहून मित्रांची घाबरगुंडी उडाली. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement
मुंढवा पोलिसांनी तपास चक्र फिरवत सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९) आणि सोनू उर्फ सोन्या मुंडे (वय २१) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडे हे पिस्तूल कोठून आले आणि त्यांनी ते का बाळगले होते, याचा तपास सहाय्यक निरीक्षक पिंगुवाले करत आहेत. पुण्यात तरुणांमध्ये वाढत चाललेली बेकायदा शस्त्रांची क्रेझ आणि त्यातून घडणारे असे जीवघेणे प्रकार आता चिंतेचा विषय ठरत आहेत.
