वेदना असह्य झाल्यावर डॉक्टर झोपलेले
मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय महिलेची ही पहिली गर्भावस्था होती आणि तिच्या सर्व तपासण्या तालेरा रुग्णालयात नियमितपणे सुरू होत्या. तपासण्यांमध्ये बाळ व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. मात्र, त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तिला केवळ डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला आणि उपचारात वेळकाढूपणा केला. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वेदना असह्य झाल्याने नातेवाईकांनी प्रसूती कक्षात धाव घेतली. त्यावेळी देखरेखीसाठी नेमलेले डॉक्टर झोपलेले आढळले, असा नातेवाईकांचा दावा आहे.
advertisement
सोनोग्राफी केली असती, तर बाळ वाचलं असतं?
या गोंधळानंतर महिलेला प्रसूती कक्षात नेऊन नैसर्गिक प्रसूती करण्यात आली. मात्र नवजात शिशूचा मृत्यू झाला. या प्रकरणी, प्रसूती वेदना सुरू असताना महिलेची तात्काळ सोनोग्राफी केली असती, तर बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसले असते. त्यावेळी तातडीने प्रसूती केल्यास बाळ वाचले असते, असे मत व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या संवेदनशील वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित नसल्याचेही सांगितले जात आहे.
'विष्ठा श्वासनलिकेत' गेल्याने मृत्यू
रुग्णालय प्रमुख डॉ. संजय सोनेकर यांनी बाळाच्या मृत्यूच्या कारणांची पुष्टी केली आहे. बाळ बाहेर येण्यासाठी धडपडत असताना त्याने पोटातच विष्ठा केली. ती विष्ठा त्याच्या श्वासनलिकेत गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सोनेकर यांनी सांगितले की, "बाळ व्यवस्थित असल्याने प्रसूतीआधी सोनोग्राफी केली नाही. देखरेखीसाठी नेमलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टर झोपलेले आढळले, आणि त्यांच्या कामाचा तो पहिलाच दिवस होता." या गंभीर घटनेची आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
