Success Story :घवघवीत यश! चार पिढ्यांनी मजुरीतच वेचलं आयुष्य; आता ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला 'अग्निवीर'
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या कुटुंबातील शंकर इथापे या जिगरबाज तरुणाची भारतीय सैन्यात 'अग्निवीर' म्हणून निवड झाली आहे. पिढ्यानपिढ्या ऊसतोडीचं काम करणाऱ्या इथापे कुटुंबासाठी शंकर हा आशेचा किरण ठरला आहे.
बारामती : बारामतीजवळील सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या 18 वर्षांपासून ऊसतोडणीसाठी येत असलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबाचं नशीब पालटणारी घटना घडली. या कुटुंबातील शंकर इथापे या जिगरबाज तरुणाची भारतीय सैन्यात 'अग्निवीर' म्हणून निवड झाली आहे. पिढ्यानपिढ्या ऊसतोडीचं काम करणाऱ्या इथापे कुटुंबासाठी शंकर हा आशेचा किरण ठरला आहे.
ऊसतोडणीच्या पैशांतून घडले स्वप्न
मूळचे बीडच्या गांधनवाडी येथील रहिवासी असलेले सोमीनाथ आणि बबिता इथापे हे शंकरचे आई-वडील आहेत. लग्नानंतर गेली १९-२० वर्षे ते सलगपणे सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी येतात. आजही त्यांची गव्हाणीवरील ऊसाच्या पाल्याची झोपडी कारखान्यावर आहे आणि ते रोजंदारीवर ऊसतोडणीचे काम करतात. शंकरचे आजोबा खंडू इथापे आणि पणजोबा गैबी इथापे यांनीही याच कामात आयुष्य वेचले.
advertisement
पीढ्यानपिढ्या सुरू असलेला हा संघर्ष शंकरने थांबवण्याचा निर्धार केला. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याच्या आई-वडिलांनी ऊसतोडणीच्या कामासाठी मिळणारी अग्रिम रक्कम (ॲडव्हान्स) घेऊन शंकरला खास पोलीस अकादमीमध्ये शिक्षणासाठी पाठवले.
चुलत भावाकडून मिळाली प्रेरणा
इथापे कुटुंबाच्या चौथ्या पिढीमध्ये शिक्षणाने क्रांती घडवली आहे. शंकरचा चुलत भाऊ कृषीराज इथापे हा नुकताच २०२२-२३ च्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी झाला होता. कृषीराजच्या प्रेरणेने शंकरने दहावी उत्तीर्ण होताच गांधनवाडीतून थेट बारामती येथील एका खासगी पोलीस अकादमीत प्रवेश घेतला.
advertisement
शंकरने दोन वर्षे सातत्याने अभ्यास केला आणि मैदानावर कसून सराव केला. त्याचबरोबर, त्याने कला शाखेतून १२ वीची परीक्षाही उत्तीर्ण केली. त्याला पोलीस व्हायचे होते, पण त्याचे वय १८ वर्षे पूर्ण झाले नसल्याने त्याने थेट अग्निवीर भरती परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. विक्रम बोंद्रे यांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले.
advertisement
वयाच्या अवघ्या साडेसतरा वर्षी शंकर भारतीय सैन्यात दाखल झाला असून, त्याच्या या यशाने बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वस्तीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शंकरचा धाकटा भाऊ वामन हा देखील सध्या ११ वीत असून, त्यालाही पोलीस दलात जायचे आहे. शंकरमुळे आता अनेक ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रेरणा मिळाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 05, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Success Story :घवघवीत यश! चार पिढ्यांनी मजुरीतच वेचलं आयुष्य; आता ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला 'अग्निवीर'


