नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस शनिवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत जय जवाननगर येथील डोंगराळ भागात खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना डोंगराच्या कडेला त्याचा अचानक तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. उंचावरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मीनगर (येरवडा) पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
advertisement
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा संयम सुटला आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की, या धोकादायक डोंगराभोवती सीमा भिंत बांधण्यासाठी महापालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले.
या भागात डोंगर कडेला राहणाऱ्या नागरिकांवर कायम मृत्यूचे सावट असते. गेल्या काही दिवसांत दरड कोसळणे आणि अशाच प्रकारच्या अपघातांमध्ये आतापर्यंत चार मोठ्या घटना घडल्या असून, त्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. श्रेयसचा मृत्यू हा या मालिकेतील पाचवा धक्का आहे. "अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?" असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
