वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार कोण?
राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष असा प्रवास करून आलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता या मतदारसंघात खासदार डॉ. कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील आणि मंगलदास बांदल अशी तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंगलदास बांदल हे अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, सध्या ते भाजपच्या जवळ असल्याचे दिसत आहे.
advertisement
वाचा - संजय धोत्रेंवरील टीका नाना पटोलेंच्या अंगलट? भाजपकडून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
वंचितचे उमेदवार फडणवीसांच्या भेटीला
वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी आज उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. इंदापूरमध्ये उद्योजक दशरथ माने यांच्या घरी ही भेट झाली. वंचितची उमेदवारी घोषित झाल्यानंतर फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. यावर मंगलदास बांदल यांना विचारले असता ते म्हणाले, की दशरथ माने यांची वैयक्तिक कामासाठी भेट घेण्यासाठी आलो होतो. सुदैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे आले. ही भेट कुठेही पूर्वनियोजित नव्हती. फक्त योगायोगाने ही भेट झाली. यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. यावरुन लोक चर्चा करत असतील तर त्याला काहीही अर्थ नाही.
