का भासतेय नवीन रस्त्याची गरज?
गेल्या दोन दशकांत राजाराम पूल ते सिंहगड पायथ्यापर्यंत प्रचंड नागरीकरण झाले आहे. तसेच पुणे-बेंगळुरू महामार्गावरून शहरात येणारी वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. सध्या पु. ल. देशपांडे उद्यान ते फनटाइम सिनेमापर्यंतचा पर्यायी रस्ता केवळ वडगाव बुद्रुकपर्यंत सोयीचा आहे. मात्र, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी आणि खडकवासला परिसरातील नागरिकांना आजही जुन्याच रस्त्यावर अवलंबून राहावे लागते. यावर उपाय म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा उन्नत मार्ग उभारण्याची मागणी केली होती.
advertisement
दहा वर्षांपूर्वी महापालिकेने विठ्ठलवाडी ते वारजे असा नदीकाठी रस्ता बनवला होता. मात्र, पर्यावरणप्रेमींनी एनजीटीमध्ये (NGT) धाव घेतल्याने आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याने, तब्बल २३ कोटी रुपये खर्चून बांधलेला तो रस्ता उखडून टाकण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती. आता हाच रस्ता 'एलिव्हेटेड' (खांबांवर आधारित) स्वरूपात केल्यास पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही आणि न्यायालयीन पेचही सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पामुळे सिंहगड रोडवरील २४ तास असणारी वर्दळ कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे.
