अश्वत्थामाचा अमरत्वाचा शाप आणि भक्ती
स्थानिकांच्या मते, महाभारतातील पात्र अश्वत्थामा आजही या मंदिरात पूजेसाठी येतो. ही श्रद्धा स्थानिकांमध्ये दृढ आहे. लोक सांगतात की, किल्ल्याचे दरवाजे संध्याकाळी बंद केले जातात आणि सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा उघडले जातात. या काळात कोणालाही आत प्रवेश करणे जवळजवळ अशक्य असते. पण सकाळी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर एक आश्चर्यकारक गोष्ट घडलेली दिसून येते. शिवलिंगावर ताजी फुले वाहिलेली असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आता प्रश्न असा आहे की, आत कोणीही नसताना ही पूजा कोणी केली असेल? हीच गोष्ट या ठिकाणाला रहस्यमय बनवते. हा चमत्कार एकदोनदा घडलेला नसून हे दररोज घडत त्यामुळे इथल्या स्थानिकांची दृढ श्रद्धा अजूनही कायम आहे.
advertisement
पौराणिक कथेनुसार, महाभारतातील गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा 'अश्वत्थामा' याला भगवान श्रीकृष्णाने अमरत्वाचा शाप दिला होता. असे मानले जाते की, अश्वत्थामा आजही जिवंत आहे आणि तो दररोज पहाटे असीरगड किल्ल्यातील या गुढ महादेव मंदिरात शिवपूजेसाठी येतो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पहाटे 4 च्या सुमारास मंदिरात कुणीतरी वावरत असल्याचा भास होतो. जेव्हा पहाटेचे पहिले किरण जमिनीवर पडतात, तेव्हा शिवलिंगावर गुलाबाची फुले आणि सुगंधी चंदनाचा लेप लावलेला दिसतो. रात्री मंदिर रिकामे असूनही ही पूजा कोण करतं, याचं उत्तर कोणाकडेही नाही.
रात्री बंद राहणारे दरवाजे आणि अदृश्य शक्ती
असीरगड किल्ल्याचा हा भाग अतिशय दुर्गम असून रात्री तिथे जाण्यास सक्त मनाई आहे. पुरातत्व विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने अनेकदा या रहस्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले, पहारेकरी बसवले गेले, परंतु कॅमेऱ्यांमध्ये केवळ धुरकट आकृत्या किंवा तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, मंदिराच्या गाभाऱ्याचे दरवाजे कुलूपबंद असूनही सकाळी पूजा झालेली आढळते. काही संशोधकांचे मते, ही एखादी अदृश्य ऊर्जा असू शकते, तर भाविकांसाठी हा साक्षात ईश्वरी चमत्कार आहे.
किल्ल्यातील तलाव आणि सुरक्षेचे नियम
मंदिराजवळच एक प्राचीन तलाव आहे, ज्याला 'शिवतालाब' म्हटले जाते. असे मानले जाते की अश्वत्थामा आधी या तलावात स्नान करतो आणि मगच महादेवाच्या पूजेला जातो. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रात्री या किल्ल्यात थांबणे कायद्याने गुन्हा आहे. स्थानिक लोक सांगतात की, ज्यांनी रात्री तिथे थांबण्याचा प्रयत्न केला, त्यांची मानसिक स्थिती बिघडली किंवा त्यांना विचित्र अनुभव आले. उन्हाळ्याच्या दिवसांतही या किल्ल्यातील गारवा आणि तिथली गूढ शांतता पर्यटकांना थक्क करून सोडते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
