अक्षय तृतीया 2026: 18 की 19 एप्रिल?
पंचांगानुसार, वैशाख शुक्ल तृतीया तिथी शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 06:22 वाजता सुरू होईल आणि रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 03:47 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात 'उदया तिथी' महत्त्वाची मानली जाते. 18 एप्रिल रोजी सूर्योदयाला तृतीया तिथी नाही, तर 19 एप्रिल रोजी सूर्योदय तृतीया तिथीमध्ये होत आहे. त्यामुळे शास्त्रानुसार, अक्षय तृतीया रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी साजरी करणे आणि याच दिवशी दान-धर्म करणे श्रेष्ठ ठरेल.
advertisement
पूजेचा शुभ मुहूर्त आणि खरेदीची वेळ
अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे आणि श्री लक्ष्मी-नारायणाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी पहिला पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06:08 ते दुपारी 12:19 पर्यंत आहे. तर सोने खरेदीचा मुहूर्त सकाळी 06:08 ते दुपारी 03:47 पर्यंत. या काळात खरेदी केलेले सोने घरामध्ये वृद्धी आणि समृद्धी घेऊन येते, अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:47 पर्यंत असेल.
अक्षय तृतीयेचा विशेष विधी आणि महत्त्व
पवित्र स्नान: या दिवशी सकाळी लवकर उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. शक्य असल्यास नदीकाठी स्नान करणे अधिक पुण्यकारक मानले जाते.
घडा भरण्याची प्रथा: अक्षय तृतीयेला मातीचा नवीन घडा आणून तो पाण्याने भरून त्याची पूजा केली जाते. उन्हाळ्याची सुरुवात असल्याने हा थंड पाण्याचा घडा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
लक्ष्मी-नारायण पूजा: पिवळे वस्त्र परिधान करून प्रभू विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळी फुले, अक्षता आणि तुळस अर्पण करावी. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने आर्थिक अडथळे दूर होतात.
पितृ तर्पण: अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने तर्पण आणि दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
'या' वस्तूंचे करा दान
अक्षय तृतीयेला केवळ सोने खरेदीच नाही, तर दानालाही विशेष महत्त्व आहे. उन्हाळ्याचा ऋतू लक्षात घेता अन्न, पाणी, छत्री, पंखा, रसाळ फळांचे दान करावे. या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने परतवू नका, कारण दिलेले दान तुमच्या आयुष्यात अनेक पटींनी परत येते. या दिवशी केलेल्या दानाचे विशेष महत्व आहे. त्यामुळे या दिवशी न चुकता काहीतरी दान करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
