गोरक्षणात 480 गाई
श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील वीजनिर्मिती बाबत माहिती देताना संचालक सतीश ठाकरे सांगतात की, आमच्या संस्थानमध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवतो. त्यापैकी एक म्हणजे गो सेवा योजना. अनेक लोक आमच्या गोरक्षणात गाई आणून सोडतात. सध्या आमच्याकडे 480 गाई आहेत. मग, या गाईंचा चारा, पाणी, औषध हा खर्च कसा करायचा? तर यासाठी ही गो सेवा योजना आहे. गाई संख्येने जास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या मल-मूत्राचा वापर डायरेक्ट शेतात करणे शक्य नव्हते. इतके खत आम्ही शेतात वापरले असते तरीही ते उरेल इतके होते. म्हणून आम्ही हा गोबरगॅस प्लांट सुरू केला, असे ते सांगतात.
advertisement
Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल वारी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, पाहा Video
विदर्भातील सर्वात मोठा गोबरगॅस प्लांट
पुढे ते सांगतात की, विदर्भातील सर्वात मोठा म्हणजेच 105 घनमीटरचा गोबरगॅस प्लांट आमच्याकडे आहे. या माध्यमातून आम्ही आमच्या संस्थानचे स्वयंपाक घर चालवतो. दररोज सकाळी आणि रात्री मिळून 600 पेक्षा जास्त लोकांचे जेवण आम्ही गोबरगॅसवर बनवतो. त्याचबरोबर दररोज दिवसातून 2 वेळा पाण्याची मोटर देखील आम्ही यावर चालवतो. म्हणजेच वर्षाला यातून आमची 12 ते 13 लाखांची बचत होते, असेही त्यांनी सांगितले.
हा प्लांट नेमका चालतो कसा?
पुढे ते सांगतात, गोबरगॅस निर्मितीसाठी यांत्रिक सिस्टीम आमच्याकडे आहे. कारण हे इतके मोठे कार्य माणसे लावून शक्य नाही. यासाठी जमिनीच्या आत खोल खड्डे केले आहेत. बाहेर तीन टाक्या केलेल्या आहेत. सर्वात आधी शेण आणि पाणी व्यवस्थित मिक्स केले जाते. त्यानंतर ते दुसऱ्या टाक्यात सोडले जाते. त्यातून ते खालील टाक्यात जमा होते. त्यानंतर गॅस आणि निचरा वेगळा होतो.
गॅस एका बलूनमध्ये भरला जातो आणि निचरा खत म्हणून वापरला जातो. ही प्रोसेस सतत सुरू असल्यासारखी असते. त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी मिथेन वेगळा करावा लागतो. त्यासाठीही व्यवस्था केलेली आहे. मिथेन वेगळा करून त्याची डायरेक्ट वीज ही जनरेटरच्या माध्यमातून मोटर चालवण्यासाठी वापरली जाते. बलूनमध्ये किती गॅस आहे, यासाठी बाहेर दोरी लावली आहे. गॅस कमी झाला की, दोरी आपोआप वर जाते, अशी माहिती संचालक सतीश ठाकरे यांनी दिली.