दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी सूर्यास्तानंतर एकाच वेळी सर्व दिवे प्रज्वलित होताच परिसर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. मंदिर, प्रवेशद्वार, कळस, गाभारा आणि परिसरातील प्रत्येक कोपरा पणत्या आणि तेलदिव्यांच्या ओळींनी झगमगत होता.
Health Facts: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? आहार तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं
advertisement
फुलांच्या तोरणांनी, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी आणि सजावटीच्या दिव्यांनी मंदिराचे परिसर उजळून गेला होता. या मनोहारी दृश्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात गर्दी केली. अनेकांनी या दिव्य आरासेचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. सोशल मीडियावर हे दृश्य झपाट्याने व्हायरल झाल्याने पुण्याबाहेरील भक्तांचाही उत्साह वाढला.
कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, त्रिपुरारी पौर्णिमा हा प्रकाशाचा सण आहे. अंध:कारावर प्रकाशाचा विजय हा संदेश प्रत्येक भक्ताच्या मनात रुजावा, हीच इच्छा आहे. मंदिरातील सर्व दिव्यांची मांडणी, तेल व वात यांची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवकांनी अनेक दिवस सातत्याने मेहनत घेतली. नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या तयारीमुळे दीपोत्सवाचा प्रत्येक क्षण भक्तिमय वातावरण निर्माण करणारा ठरला.
हा दीपोत्सव केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. हजारो दिव्यांच्या उजेडात दगडूशेठ गणपतीचे मंदिर भक्तिभाव, सौंदर्य आणि परंपरेच्या तेजाने उजळले. गणरायाच्या या प्रकाशोत्सवाचे दर्शन घेताना भक्ताचा चेहरा खुळावला होता.





