कोल्हापूर : प्रभू श्रीरामचंद्रांची बरीचशी मंदिरे ठिकठिकाणी आढळतात. बऱ्याचदा गाभाऱ्यात उभे असणारे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि त्यांच्या पायाशी बसलेले हनुमंत अशीच मूर्ती पाहायला मिळत असते. मात्र कोल्हापुरात एक अनोखे राम मंदिर आहे. या मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मांडीवर सीतामाता बसली असल्याची मूर्ती आहे. ही अशी अनोखी मूर्ती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिराबाबत अधिक माहिती कोल्हापूरच्या मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे.
advertisement
कोल्हापूरच्या मिरजकर टिकटी येथील नूतन मराठी शाळेजवळचा भाग मंदिर समूह म्हणून ओळखला जातो. याठिकाणी श्री नृसिंह, दत्त, विठ्ठल, ओंकारेश्वर अशा अनेक देवतांची मंदिरे आहेत. त्यातच एक अनोखे राम मंदिर देखील इथे पाहायला मिळते. त्या राम मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी ज्या रूपात आपण प्रभू श्रीरामांचे मूर्ती पाहतो ते रूप या मंदिरात पाहायला मिळत नाही. सीतामाता प्रभू श्रीरामांच्या मांडीवर बसलेली असल्याचे रूप या मंदिरातील मूर्ती मधून दाखवण्यात आले आहे. हीच गोष्ट या मंदिराला इतरांहून वेगळी बनवते, असे उमाकांत राणिंगा सांगतात.
Ram Navami Wishes : श्रीराम जन्मोत्सव करा आनंदात साजरा, सर्वांना पाठवा हे शुभेच्छा संदेश!
कसे आहे हे राम मंदिर?
या राम मंदिरामध्ये स्वतः रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय अद्वितीय असा प्रसंग भक्तांना पाहायला मिळतो. मंदीरात मुक्तकेशी अर्थात मोकळे सोडलेले प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांच्या वामांगावर अर्थात त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली सीतामाता आहे. हे शिल्प वालुकामय पाषाणात घडवलेले एक शिल्प म्हणजे जणू वनवासात असलेल्या प्रभू रामचंद्र आणि सीतेच्या प्रेमभाव प्रसंगाची आठवण करून देणारे शिल्प आहे. खरंतर प्रभू रामचंद्र सम्राट होते. त्यामुळेच सर्वत्र आपल्याला कोदंडधारी म्हणजेच धनुष्य धारण केलेल्या रामचंद्रांची मूर्ती पाहायला मिळते. पण प्रकृती आणि पुरुष जे दोन विश्वाचे मूल तत्त्व आहेत. त्या तत्त्वाचे एकरूपत्व दाखवणारेच असे हे एक अद्वितीय शिल्प असल्याचे राणिंगा सांगतात.
कशी आहे गाभाऱ्यातील मूर्ती
या मंदिरातील मूर्ती ही वालुकामय काळ्या पाषाणात कोरण्यात आलेली आहे. मूर्तीशास्त्राच्या अभ्यासानुसार किमान तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुने हे मंदिर असावे. परंतु वालुकामय असल्यामुळे या शिल्पाची बरीचशी झिज झालेली पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश करताच सभा मंडपातून पुढे दोन पायऱ्या चढून वर गेल्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात चौथ्यावर चार खांबांवर उभा एक मंडप आहे. याच्याच मध्यभागी प्रभू श्रीराम आणि सीता मातेची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. शेजारीच हनुमंताची मूर्ती देखील पाहायला मिळते, अशी माहिती देखील राणिंगा यांनी दिली आहे.
Ram Navami 2024: अयोध्येतून मिळालेल्या आमंत्रण अक्षतांचा आज असा करा वापर; श्रीरामाची मिळेल अपार कृपा
दरम्यान या अनोख्या मूर्तीचे आणि मंदिराचे हे वैशिष्ट्य जाणून घेतल्यानंतर मंदिराला एकदा नक्की भेट दिली गेली पाहिजे. तरच हे प्रभू श्रीरामांचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन मिळू शकेल.
पत्ता : श्री राम मंदिर, मंदिर समूह, नूतन मराठी शाळेजवळ, मंगळवार पेठ कोल्हापूर - 416002