पुणे : राज्यभरात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यात पेशवेकाळात बांधलेलं एक ऐतिहासिक राममंदिर आहे. पानीपत युद्धातील पराभवानंतर सन 1761 मध्ये पुणेकरांसाठी हे मंदिर बांधले. यंदा या मंदिरात 264 वा रामजन्मोत्सव साजरा होतोय. त्यासाठी मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
पानिपत युद्धानंतर बांधलं मंदिर
पुण्याचे सुभेदार असलेल्या श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी पानिपताच्या लढाईनंतर पुणेकरांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने 1761 मध्ये राम मंदिराची स्थापना केली. 1765 च्या नोव्हेंबरमध्ये राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी घडविल्या. त्याबद्दल त्यांना 372 रुपये देण्यात आले होते. या मंदिरात अनेक परंपरा आजही जोपासल्या जातात, असे विजय गंजीवाले यांनी सांगितले.
Ram Navami: ‘श्री राम जय राम...’, मंत्र एक, फायदे अनेक! त्रयोदशाक्षरी तारक मंत्र माहितीये का?
रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम
पुण्यातील या ऐतिहासिक राम मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच मंदिरात मंगलवाद्यांच्या गजरात पूजाअर्चा, राम जन्माची विशेष आरती, रामरक्षा पठण, तसेच रामायणाचे पारायण करण्यात येत आहे. याशिवाय कीर्तन, भजन आणि प्रवचनांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जीवनचरित्र भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाविकांची गर्दी
संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी आणि पारंपरिक सजावटीने अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी पुण्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी मंदिरात दिसून येत आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भाविक प्रभूंच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.