ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फास्ट बॉलर मिचेल स्टार्क याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी रुपये मोजले, पण आता स्टार्कच्या आयपीएल सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कला अजून आयपीएल खेळण्यासाठी एनओसी मिळालेलं नाही. आयपीएलचा 19 वा मोसम आता फक्त 5 दिवसांवर आलेला असताना स्टार्कच्या सस्पेन्समुळे दिल्लीची टीम टेन्शनमध्ये आहे.
मिचेल स्टार्क पुन्हा धोका देणार?
advertisement
ऑपरेशन सिंदूरमुळे आयपीएल 2025 स्पर्धा अर्धवट थांबवण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली, तेव्हा मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आणि उरलेले सामने खेळण्यासाठी परत आला नाही. तसंच याआधीही स्टार्कने अनेकदा आयपीएल लिलावात नाव नोंदवलं नाही किंवा दुखापतींमुळे तो अनेकदा आयपीएल खेळू शकला नाही.
मिचेल स्टार्क खेळणार का नाही? याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल, कोच हेमांग बदानी आणि क्रिकेट डायरेक्टर वेणुगोपाल राव यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यावर तिघांनीही स्टार्कबद्दल सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली. आयपीएलच्या मागच्या मोसमात स्टार्कने 11 सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या होत्या.
स्टार्क नसला तरी पर्याय उपलब्ध
'आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एनओसी मिळण्याची वाट पाहत आहोत. एनओसी मिळाल्यानंतर आम्हाला स्टार्क टीममध्ये कधी येईल, याची माहिती मिळेल. आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संपर्कात आहोत, स्टार्क सराव करत आहे, काही दिवसांपूर्वी त्याने बॉलिंगही केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला फिट घोषित करत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही', असं हेमांग बदानी म्हणाला आहे.
'स्टार्क कधी येणार, याचं उत्तर देणं आतातरी कठीण आहे. स्टार्कला एनओसी मिळाली तर तो पहिल्या मॅचआधीच येऊ शकतो. तो आला नाही तर आम्ही दुसऱ्या डावखुऱ्या फास्ट बॉलरला टीममध्ये घेऊ. टी. नटराजन चांगली कामगिरी करत आहे', अशी प्रतिक्रिया अक्षर पटेलने दिली आहे.
