सेमी फायनलमध्ये जम्मू-काश्मीरने बंगालचा 6 विकेटने पराभव करून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली. या विजयानंतर खेळाडूंनी प्रशिक्षक अजय शर्मा यांना आपल्या खांद्यावर घेतलं आणि 'भाइयों में भाई कैसा हो, अज्जू भैया जैसा हो' असे नारे लावले. 1990 च्या दशकात भारताकडून खेळणारे अजय शर्मा 15 वर्ष क्रिकेटपासून लांब राहिले. अजय शर्मा यांनी त्यांच्या मुलालाही क्रिकेटपटू बनवण्याचा प्रयत्न केला, पण यात ते अयशस्वी झाले.
advertisement
मॅच फिक्सिंगच्या आरोपाने करिअर संपलं
दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अजय शर्मा यांची कारकिर्द मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे संपली. त्यानंतर अजय शर्मा अनेक वर्ष अज्ञातवासात राहिले, पण आता जम्मू-काश्मीरला फायनलमध्ये नेल्यानंतर अजय शर्मा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. दिल्ली कोर्टाकडून मॅच फिक्सिंग प्रकरणात निर्दोष मुक्तता होण्याआधी 15 वर्ष अजय शर्मा क्रिकेटपासून लांब राहिले. जम्मू-काश्मीरला रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर हा आपला पूनर्जन्म असल्याची प्रतिक्रिया अजय शर्मा यांनी दिली आहे.
'हा अजय शर्माचा पुनर्जन्म आहे. खटला सुरू होता, तेव्हा कुणी नावही घेत नव्हते. मी माझा मोठा मुलगा मनन याला भारताकडून खेळण्यासाठी प्रवृत्त करत होतो, कदाचित त्याला वडिलांमुळे खूप अडचणी आल्या असतील. वर्षानुवर्षे फोन किंवा मेसेज न करणारे लोक आता माझ्याशी संपर्क साधत आहेत, पण मला त्याबद्दल पश्चात्ताप नाही. या खेळाडूंनी मला दाखवलेलं प्रेम आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे', अशी भावनिक प्रतिक्रिया अजय शर्मा यांनी दिली आहे.
मिथुन मन्हास-अजय शर्मा कनेक्शन
चार वर्षांपूर्वी अजय शर्मा दिल्ली अंडर-19 टीमचे प्रशिक्षक होते, त्यावेळी सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी अजय शर्मा यांना जम्मू-काश्मीरच्या टीममध्ये सामील व्हायला सांगितलं, पण तेव्हा अजय शर्मा यांनी यात रस दाखवला नाही. मन्हास त्यावेळी जम्मू-काश्मीर क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक होते. मिथुन मन्हास यांनी अजय शर्मांच्या नेतृत्वामध्येच दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
'जेव्हा तुम्ही दिल्लीकडून टेस्ट क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंसोबत खेळता तेव्हा तुम्ही वेगळ्या पातळीवर आहात, असं तुम्हाला वाटतं. खेळताना आम्ही कधीही जम्मू-काश्मीरला गांभीर्याने घेतलं नाही. मिथुनने फोन केला तेव्हा मी थायलंडमध्ये सुट्टीवर होतो, मी हसलो. मला दिल्लीच्या वरिष्ठ टीमचं प्रशिक्षक व्हायचं होतं', असं अजय शर्मा म्हणाले.
मिथुन मन्हासनी नंतर पुन्हा अजय शर्माशी संपर्क साधला. यावेळी, गोष्टी व्यवस्थित झाल्या. अजयनी जम्मू आणि काश्मीरचे प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शविली. जम्मू-काश्मीरने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करावी, असं मिथुन मन्हासना वाटत होतं आणि यासाठी आपण मिथुनला पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचं अजय शर्मा यांनी सांगितलं.
पहिल्याच वर्षात अडचणी
प्रशिक्षक म्हणून पहिल्या वर्षात अजय शर्माना अनेक अडचणी आल्या. खेळाडूंना आयपीएल आणि टी-20 क्रिकेट खेळायचे होते. अभिप्राय स्वरूपात, खेळाडूंनी अजय शर्मा यांचे वर्णन एक उग्र स्वभावाचा व्यक्ती म्हणून केले. 20 पैकी फक्त दोन किंवा तीन खेळाडू त्याच्या बाजूने बोलले. जम्मू आणि काश्मीर क्रिकेटने याची दखल घेतली.
अजय शर्मा दुखावले
त्यावेळी अजय शर्मा यांना या टिप्पण्यांमुळे वाईट वाटले. 'जेव्हा कोणी कडक शिक्षक क्लासमध्ये येतो तेव्हा मुले विचार करतात, याला इथून हाकलून लावा. श्रीनगरमधील पहिल्या कॅम्पमध्ये बॅटर फक्त सिक्स मारण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मला वाटले, मी कुठून सुरुवात करावी?', असं अजय शर्मा म्हणाले.
मनहासनी दिला सौम्य व्हायचा सल्ला
अजय शर्मा यांना त्यांच्या पत्नीनेही सल्ला दिला. बहुतेक मुलं तुमच्या मुलांपेक्षा मोठी आहेत. तुम्ही ज्या प्रसिद्ध खेळाडूंसोबत वाढला आहात, त्यांच्याशी या मुलांची तुलना करणं थांबवा, असं पत्नीने अजय शर्मा यांना सांगितलं. तर मिथुन मन्हासने अजयना थोडं सौम्य व्हायचा सल्ला दिला. याशिवाय अजय शर्मा यांनी बीसीसीआयच्या उपसमितीचे सदस्य निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांचाही सल्ला घेतला. मला वाटतं प्रशिक्षण देणं आणि खेळणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यानंतर माझे विचार बदलले, असं अजय शर्मानी सांगितलं.
जम्मू-काश्मीरचा विदर्भावर विजय
विदर्भाविरुद्ध जम्मू-काश्मीरला विजय मिळाल्यानंतर अजय शर्मा यांना खेळाडूंच्या प्रतिभेची जाणीव झाली. संयम महत्त्वाचा आहे, हे मला समजलं. मला यासाठी 2 वर्ष लागली, पण त्यानंतर ड्रेसिंग रूम एकत्र आली. खेळाडूंनी विचारायला सुरूवात केली, की रणजी सामने जिंकण्यासाठी काय करावं लागेल. मला त्यांचा दृष्टीकोन बदलताना जाणवत होता, असं अजय शर्मा म्हणाले.
अब्दुल समदला वगळलं
अब्दुल समदने मुंबईविरुद्ध त्याची विकेट टाकली तेव्हा अजय शर्मा यांनी त्याला बडोद्याविरुद्धच्या सामन्यातून बाहेर केलं. हा संदेश टीममधल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला. जर अब्दुल समदला वगळण्यात येत असेल, तर कुणीही असू शकते.
जम्मू-काश्मीरने इंदूरमध्ये मध्य प्रदेश, दिल्लीमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये मुंबईवर विजय मिळवला आणि जम्मू-काश्मीरने प्रगती केली आहे, हे देशाला दाखवून दिलं. अजय शर्मा हे जन्माने डोगरा असल्यामुळे त्यांना जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सदस्यपद मिळाले आहे, यासाठी त्यांनी डीडीसीएचे सदस्यत्वही सोडलं आहे. मी इथेच राहणार आहे, हे खेळाडूंना माहिती आहे, असं अजय शर्मा म्हणाले आहेत.
