फ्रँचायझीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिस्टन म्हणाली, "प्रशिक्षक म्हणून मी येथे पहिल्यांदाच आले आहे. झुलन गोस्वामीसोबत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे, ज्यांच्याविरुद्ध मी क्रिकेट खेळले आहे त्यापैकी ती एक आहे. एवढ्या दीर्घ कालावधीत त्यांनी विजयी मालिका निर्माण केली आहे हे अविश्वसनीय आहे. खेळाडूंचा हा ग्रुप किती जवळचा आहे याबद्दल तुम्ही प्रत्येकाला बोलताना ऐकता. ते एका कुटुंबासारखे आहेत. तुम्हाला त्या कुटुंबाचा भाग व्हायचं असतं.''
advertisement
क्रिस्टन मुंबई इंडियन्समध्ये व्यापक प्रशिक्षणाचा अनुभव घेऊन येत आहे. टीममध्ये मुख्य प्रशिक्षक लिसा कीटली, बॉलिंग प्रशिक्षक आणि मार्गदर्शक झुलन गोस्वामी, बॅटिंग प्रशिक्षक देविका पळशीकर आणि फिल्डिंग प्रशिक्षक निकोल बोल्टन यांचा समावेश आहे. क्रिस्टन बीम्सने ऑस्ट्रेलियासाठी 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 22.45 च्या सरासरीने 42 विकेट घेतल्या आहेत. तिने 18 टी-20 सामन्यांमध्ये 20 बळीही घेतले आहेत. बीम्सने ऑस्ट्रेलियासाठी एक कसोटी सामनाही खेळला आहे. क्रिस्टन बीम्सने महिला बिग बॅश लीगमध्ये 45 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 24.08 च्या सरासरीने 37 बळी घेतले आहेत.
प्रशिक्षणाची कारकिर्द
तिच्या प्रशिक्षण कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, क्रिस्टन बीम्सने महिला बिग बॅश लीगमध्ये प्रशिक्षण दिले आहे. तिने ऑस्ट्रेलिया महिला अंडर-19 टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. याव्यतिरिक्त, क्रिस्टनने क्रिकेट ऑस्ट्रेलिया येथे राष्ट्रीय विकास प्रमुख आणि क्रिकेट टास्मानिया येथे कम्युनिटी क्रिकेट व्यवस्थापक-दक्षिण म्हणून काम केले आहे.
मुंबईची तिसऱ्या ट्रॉफीवर नजर
दोन वेळची विजेती मुंबई इंडियन्स 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या WPL च्या नवीन हंगामात तिसरी ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल. टीममध्ये प्रमुख खेळाडू, ज्यात कर्णधार हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर आणि जी. कमलिनी यांचा समावेश आहे, त्यांना लिलावापूर्वी फ्रँचायझीने कायम ठेवले होते. शिवाय, मुंबईने अलिकडच्या T20 विश्वचषकातील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अमेलिया केर, तसेच एस. सजना, सईका इशाक, संस्कृती गुप्ता आणि अनुभवी फास्ट बॉलर शबनीम इस्माईल यांनाही परत बोलावले आहे.
