नेमका अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय संभाजी पाटील हे आपल्या सहकाऱ्यासह पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात होते. मंगळवारी सकाळी १० ते ११ च्या सुमारास त्यांची फॉर्च्युनर कार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर शहराजवळ आली असता, हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या कारने एका अवजड वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
advertisement
मित्र गंभीर जखमी
या अपघातात संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले सहकारी यश प्रशांत चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमी यश चौधरी यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान
संभाजी पाटील हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीमध्ये त्यांनी आपल्या कौशल्याने ठसा उमटवला होता. एका तरुण खेळाडूचा असा अकाली मृत्यू झाल्याने क्रीडा प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर संभाजी पाटील यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
