संजय मांजरेकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. श्रेयस अय्यरला सर्वोत्तम कामगिरी करूनही एका फॉरमॅटमध्ये संघातून वळण्यात आले, तर शुभमन गिलला त्याच्या जागी फक्त त्याच्या कसोटी कामगिरीमुळे त्या फॉरमॅटमध्ये संधी मिळाली.
संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी निवड समितीवर टीका केली आहे. मागच्या काही वर्षापासून एका फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दुसऱ्या फॉरमॅटमध्येही जागा मिळते. त्यामुळे जेव्हा मी एखाद्या खेळाडूला कसोटी सामन्यांमधील कामगिरीच्या आधारे टी20 संघात स्थान मिळवताना पाहतो तेव्हा मला ते क्रिकेटच्या तर्काच्या पलीकडे जाते,असे संजय मांजरेकर म्हणतात.
advertisement
श्रेयस अय्यरला एक वेळेस संघाबाहेर करण्यात आले होते. कारण बीसीसीआयला वाटलं होतं, श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेटला गांभिर्याने घेत नाही आहे.पण त्यानंतर देखील त्याने देशांतर्गत सामन्यात भाग घेतला, इंग्लंड विरूद्ध सिरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये जबरदस्त खेळी केली.50 पेक्षा जास्त सरासरी आणि 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट, मला वाटत नाही की संपूर्ण आयपीएल हंगामात कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केली असेल,असे संजय मांजरेकर आवर्जुन नमूद करतात.
संजय मांजरेकर यांच म्हणणं इतकंच आहे की श्रेयस अय्यरने त्याच्या पुनरागमनानंतर एकही चूक केलेली नाही. त्याने सर्वत्र धावा केल्या, संघासाठी सामने जिंकले आणि त्याचा खेळ एका नवीन पातळीवर नेला, परंतु तरीही त्याला आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, शुभमन गिलला त्याच्या कर्णधारपदामुळे आणि कसोटी क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे टी20 संघात परत बोलावण्यात आले आणि त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले.त्यामुळे श्रेयस सोबत अन्याय झाल्याचे संजय मांजरेकरांना वाटते.
श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल दोघांनीही आयपीएल 2025 मध्ये शानदार कामगिरी केली. शुभमन गिलची सरासरी 50.00 होती,तर श्रेयसची सरासरी 50.33 होती. त्याच वेळी, श्रेयसचा स्ट्राइक रेट 175.07 होता, तर शुभमन गिलचा फक्त 155.87 होता. म्हणजेच, श्रेयस अय्यरने खूप वेगवान फलंदाजी केली.त्यामुळे त्याला संधी मिळणे गरजेचे होते.