एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये रविवारी क्रिकेट मॅच सुरू होती, तेव्हा 21 वर्षांचा डोला अजित बाबू आपला मित्र बुडूमुरी चिरंजीवीसोबत अंपायरिंग करत होता. तेव्हा रन आऊटच्या एका निर्णयावरून खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला.
दोन्ही अंपायरवर चाकू हल्ला
अजित बाबू आणि चिरंजीवी यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केलं होतं, पण कांता किशोर नावाचा एक प्रेक्षक संतापला आणि त्याने अंपायर आणि खेळाडूंना शिव्या द्यायला सुरूवात केली. मॅच संपल्यानंतर 26 वर्षांच्या कांता किशोरने अंपायरना वाद सोडवायला बोलावलं, यानंतर अजितबाबू आणि चिरंजीवी आपल्या मित्रांसोबत कांता किशोरला भेटायला गेले, पण तिथे पुन्हा एकदा वादाला सुरूवात झाली आणि कांता किशोरने चाकू काढून दोन्ही अंपायरवर हल्ला केला.
advertisement
अजितबाबूच्या छातीमध्ये चाकू भोसकला गेला त्यामुळे तो जमिनीवरच कोसळला. यानंतर चिरंजीवी अजितबाबूला वाचवायला गेला पण त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. तिसरा व्यक्ती दोघांनाही वाचवायला गेला तेव्हा तोदेखील जखमी झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी मल्लेश्वरा राव यांनी दिली आहे.
हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमी झालेल्या अजितबाबूला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
