अस्तगाव हे ‘नर्सरीचं गाव’ म्हणून ओळखले जाते. या गावातील सतीश अत्रे यांनी निवडुंगाच्या लागवडीला व्यवसायाचे रूप देत केवळ स्वतःचीच नव्हे, तर संपूर्ण गावाची ओळख राष्ट्रीय पातळीवर पोहोचवली आहे. विविध देशांमधील निवडुंगाच्या जाती, त्यांची वाढ, देखभाल आणि बाजारपेठ यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपल्या नर्सरीत दुर्मिळ व आकर्षक रोपांची लागवड सुरू केली. आज त्यांच्या नर्सरीतील निवडुंगांना देशभरातून तसेच परदेशातून मोठी मागणी आहे. या काटेरी रोपांनीच त्यांना आर्थिक स्थैर्याबरोबरच यशाची नवी उंची गाठून दिली आहे.
advertisement
प्रयोगाची सुरुवात
निवडुंग म्हटले की काटे आणि रानटीपणा अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते. मात्र सतीश अत्रे यांनी याच काटेरी वनस्पतीत संधी पाहिली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी निवडुंगावर संशोधन सुरू केले. देशातील विविध भागांतून तसेच परदेशातून निवडुंगाच्या जाती गोळा करत त्यांनी स्वतःची नर्सरी उभारली. फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती यांच्यासोबतच निवडुंगाच्या दुर्मिळ जातींचे संवर्धन त्यांनी केले. कमी पाणी, कमी देखभाल आणि दीर्घकालीन टिकाऊपणा हे निवडुंगाचे फायदे लक्षात घेऊन त्यांनी या शेतीला व्यावसायिक स्वरूप दिले.
राष्ट्रीय स्तरावर ओळख
सतीश अत्रे यांच्या कामाला पहिल्यांदा मोठी दखल गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे घेण्यात आली. भारतातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारक परिसरात भव्य गार्डन उभारण्याचे काम त्यांना मिळाले. सुमारे ४० एकर परिसरात लँडस्केपिंग डिझाइन करून विविध थीमवर आधारित बागा विकसित करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. विशेष म्हणजे या प्रकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन एकर क्षेत्रात निवडुंगाची स्वतंत्र बाग असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
यशस्वी अंमलबजावणी
२०१८ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पात सतीश अत्रे यांनी ४० एकर जागेत वेगवेगळ्या प्रकारच्या गार्डन्स साकारल्या. यात देश-विदेशातील दोन हजारांहून अधिक फुलझाडे, दीड हजारांपेक्षा जास्त निवडुंगाच्या जाती आणि अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. एका ग्रामीण भागातील शेतकरी केवळ मेहनत, अभ्यास आणि कल्पकतेच्या जोरावर इतक्या मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
