सर्व्हर हा एक विशेष प्रकारचा कॉम्प्युटर किंवा उपकरण असतं. तो एकाच नेटवर्कवर इतर कॉम्प्युटर्सचा डेटा आणि सेवा किंवा प्रोग्रॅम चालवतो. सहसा सर्व्हरशी जोडलेल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरला त्या सर्व्हरचा क्लायंट म्हटलं जातं. त्यामुळे सर्व्हर हे एक असं सेंटर मशीन ठरतं जे एका संपूर्ण नेटवर्कवर काम करणाऱ्या कॉम्प्युटर्सना आवश्यक प्रोग्रॅम किंवा डेटा स्टोअर करुन देतं. त्यामुळे रिअल टाईम डेटा वर्क त्या नेटवर्कवर काम करणाऱ्यांना मिळतं. सर्व्हरला नेटवर्क साधनं मॅनेज करण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तरं देण्यासाठी आवश्यक माहिती देण्याची सेवा पुरवणारी यंत्रणा असं म्हणता येईल. सर्व्हर साधनांना एका जागी सेंट्रलाईज करुन अधिक प्रभावी डेटा मॅनेजमेंट आणि संप्रेषण सक्षम करुन महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
advertisement
सर्व्हर अनेक प्रकारची कामं करतात. वेबसाईट्स होस्ट करणं, ईमेल व्यवस्थापन करणं, फाईल्स सेव्ह करणं आणि ॲप्लिकेशन्स चालवणं या कामांचा समावेश आहे. सर्व्हरचे अनेक प्रकार असतात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हर उपयोगी पडतात. वेब सर्व्हर्स हे युझर्सच्या ब्राउझरवर वेब पेज पाठवण्याचं काम करतात. नेटवर्क वापरणाऱ्यांसाठी फाईल्स कलेक्ट करणं आणि मॅनेज करणं हे काम फाईल सर्व्हर करतो. डेटाबेस सर्व्हर्स हे विविध कामांसाठी डेटाबेसची सेवा देतात.
बहुतेक सर्व्हर हे विंडोज किंवा लिनक्स सारख्या विशेष ऑपरेटिंग सिस्टिम्सवर काम करतात. ते हार्डवेअर साधनांचं व्यवस्थापन करतात आणि सर्व्हर आणि क्लायंट यांना कम्युनिकेशनची सेवा देतात. सर्व्हर साधनांना सेंट्रलाईज करुन कुशल डेटा व्यवस्थापन आणि संप्रेषण सक्षम नेटवर्क तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये एखादी यूआरएल टाईप करता तेव्हा तुमचा कॉम्प्युटर त्या वेबसाईटला होस्ट करणाऱ्या सर्व्हरला एक मागणी पाठवतो. सर्व्हरला ती मागणी प्राप्त होताच तो तुमच्या कॉम्प्युटरवर आवश्यक माहिती पाठवतो आणि तुम्हाला हवं असलेलं वेबपेज उघडतं. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे सर्व्हरचे महत्त्वाचे भाग असतात. हार्डवेअरमध्ये खूप जास्त डेटा आणि फास्ट प्रदर्शन यांसाठी सहसा RAID कॉन्फिगरेशनमध्ये अनेक हार्ड ड्राईव्हचा वापर केला जातो. एकाच वेळी अनेक रिक्वेस्ट्स मॅनेज करण्यासाठी पुरेशी रॅम आणि सीपीयू असतात. सॉफ्टवेअरमध्ये सर्व्हर विविध ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करुन अपाचे, एनजीएनएक्ससारखी ॲप्लिकेशन्स चालवतात. डेटाबेससारख्या सेवा पुरवतात. संप्रेषण किंवा संचारमध्ये सर्व्हर HTTP सारखे प्रोटोकॉल वापरुन संप्रेषण करतात. ब्राउझरला सर्व्हरपासून डेटाची मागणी करणं आणि तो मिळवणं या बाबत परवानगी देतात.
सर्व्हर डाउन होण्याची अनेक कारणं असू शकतात. मशीनला कार्यान्वित ठेवणारा वीज पुरवठा खंडित झाला तर त्याचा परिणाम सर्व्हरच्या कामकाजावर होऊ शकतो. हार्ड ड्राईव्ह, नेटवर्क कार्ड किंवा सीपीयूसारखे पार्ट खराब झाले तर सर्व्हर डाउन होऊ शकतो. सर्व्हरची ऑपरेटिंग सिस्टिम किंवा सॉफ्टवेअरमधील अडचणींमुळे सर्व्हर डाउन होऊ शकतो. उदाहरणार्थ एक करप्ट फाईलही सर्व्हर क्रॅशला कारणीभूत ठरु शकते. नेटवर्क कार्ड किंवा नेटवर्क कनेक्शनच्या समस्येमुळे सर्व्हरला अन्य उपकरणांसह संप्रेषणात अडचणी आणू शकतात. सर्व्हरच्या कामकाजात इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जास्त तापमान किंवा आर्द्रता हार्डवेअरमध्ये बिघाड करु शकतात. त्यामुळेही सर्व्हर डाउन होण्याची शक्यता असते. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या बाजूने काही अडचणी असल्यास सर्व्हरचा डाउन टाईम येऊ शकतो. राउटर किंवा केबल यांच्यातील दोषही सर्व्हर डाउन होण्यास कारणीभूत ठरु शकतात. मालवेअर्स किंवा व्हायरस यांच्यामुळेही अनेकदा सॉफ्टवेअर सर्व्हरमध्ये बिघाड होऊ शकतो. सायबर ॲटॅक हे अनेकदा सर्व्हर डाउन होण्यास कारणीभूत ठरु शकतात.
