बस प्रवास आता 'स्वस्त' उरला नाही
सध्याची वाढती महागाई तसेच इंधनाच्या दरातील सततचे चढ-उतार आणि वाढलेला खर्च यामुळे ठाणे महानगरपालिका यांच्या वाहतूक सेवेवर मोठा आर्थिक ताण आला आहे. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी तब्बल 11 वर्षांनंतर बस भाडे वाढवण्याचा गंभीर विचार सुरू झाला आहे. यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी प्रशासन करत आहे.
advertisement
टीएमटीसमोर मोठे आर्थिक आव्हान
सध्या ठाणे परिवहन सेवेचे वार्षिक उत्पन्न सुमारे 90 ते 95 कोटी रुपये आहे. मात्र बसेस चालवण्यासाठी एकूण खर्च 350 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये बस देखभालीसाठी 150 कोटी,ई-बस प्रकल्पासाठी 50 कोटी तसेच वीज, इंधन आणि दुरुस्तीचा खर्च एकत्र आहे. वाढत्या मनुष्यबळाच्या खर्चामुळे आणि जुन्या दररचनेमुळे दर्जेदार सेवा देणे कठीण झाले आहे.
सध्या ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी) च्या ताफ्यात 407 बसेस आहेत. त्यापैकी 380 बसेस दररोज धावतात आणि सुमारे 2.45 लाख प्रवाशांना सेवा देतात. दररोज जवळपास 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते पण विविध सवलतींमुळे 5 ते 6 लाख रुपयांचा महसूल कमी होतो.
शेवटची वाढ 2015 मध्येच
शेवटची भाडेवाढ 2015 मध्ये झाली होती उलट 2023 मध्ये एसी बसच्या भाड्यात 40 ते 50 टक्के कपात करण्यात आली होती. मात्र वाढत्या तोट्यामुळे आता भाडेवाढ हा शेवटचा उपाय असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
