सकाळची ती वेळ अन् समोर साक्षात मृत्यू
माजिवाडा जंक्शन परिसरात नाशिक-मुंबई मार्गावरील हाइट बॅरियर गुरुवारी सकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास तुटून रस्त्यावर लटकत असल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता.
सुदैवाने जीवितहानी टळली
स्थानिक नागरिक मंगेश बसवंत यांनी पुलाजवळील हाइट बॅरियर तुटून धोकादायक अवस्थेत असल्याचे पाहिले. पुढे होणारा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवले. माहिती मिळताच पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तुटलेला आणि खाली लटकत असलेला बॅरियर सुरक्षितरीत्या हटवला. या कामादरम्यान काही वेळ वाहतूक मंदावली होती. मात्र प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.
दरम्यान हाइट बॅरियर नेमका कशामुळे तुटला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.
