बेडरुममधून ओढत केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन 'डेल्टा फोर्स'ने एका गुप्त मोहिमेअंतर्गत मादुरो यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. ज्यावेळी ही कारवाई झाली, तेव्हा मादुरो त्यांच्या बेडरुममध्ये झोपलेले होते. अमेरिकन सैन्याने त्यांना तिथून ओढत बाहेर काढले. ट्रम्प यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मादुरो यांच्या हातांत बेड्या असून त्यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली दिसत आहे.
advertisement
USS Iwo Jima युद्धनौकेवरून न्यूयॉर्कला रवानगी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकन युद्धनौका 'USS Iwo Jima' वर ठेवण्यात आले असून त्यांना तिथून थेट न्यूयॉर्कला नेण्यात आले आहे. ताज्या वृत्तानुसार, मादुरो यांना घेऊन अमेरिकन सैन्यदल न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहे.
"मी त्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते" - ट्रम्प
या कारवाईनंतर 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, "मी आठवड्याभरापूर्वी मादुरो यांच्याशी स्वतः संवाद साधला होता. मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तुम्हाला सरेंडर करावं लागेल. पण त्यांनी ऐकले नाही, अखेर आम्हाला ही कारवाई करावी लागली."
व्हेनेझुएलाचे मदतीसाठी आवाहन
दुसरीकडे, व्हेनेझुएला सरकारने या घटनेचा तीव्र निषेध केला असून याला 'थेट आक्रमण' असे संबोधले आहे. व्हेनेझुएलाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. अमेरिकेने गेल्या अनेक काळापासून मादुरो सरकारवर ड्रग्ज तस्करीचे आरोप केले होते. ३ जानेवारी रोजी कॅराकसमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने 'फुएर्ते तिउना' आणि 'ला कार्लोटा' सारख्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या कारवाईमुळे दक्षिण अमेरिकेसह संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
