अचानक खाली आले, मग झाला स्फोट
हा अपघात अमेरिकेच्या मोजावे डेझर्टमधील ट्रोना परिसरात घडला. प्रत्यक्षदर्शींनी आणि काही व्हिडिओमध्ये हे जेट वेगाने खाली येत असल्याचे स्पष्ट दिसते. जमिनीवर धडकताच विमानाचा मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ उठले. अमेरिकेच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, F-16C Fighting Falcon हे विमान आज सकाळी सुमारे १०.४५ वाजता एका ट्रेनिंग मिशनदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघात स्थळ लॉस एंजेलिसपासून सुमारे १८० मैल दूर आहे.
advertisement
पायलट सुरक्षित, सध्या रुग्णालयात
अपघात होताच अग्निशमन विभागाला तातडीने 'एअरक्राफ्ट इमर्जन्सी'चा अलर्ट मिळाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकाने योग्य वेळी 'इजेक्ट' करत पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित लँडिंग केले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्याला कोणताही जीवघेणा दुखापत झालेली नाही. वैमानिकाचे आरोग्य धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातामागचे नेमके कारण काय? तपास सुरू
F-16 फायटर जेट क्रॅश होण्यामागे नेमके काय कारण होते? तांत्रिक बिघाड झाला की अन्य काही समस्या होत्या? याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी हवाई दलाने तात्काळ तपास सुरू केला आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील अनेक फायटर जेट अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. २०२० मध्ये याच भागात नेव्हीचे F/A-18E सुपर हॉर्नेट कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला होता, याची आठवण या निमित्ताने झाली.
नव्या विमानांवर भर
जागतिक स्तरावरच्या या लढाऊ विमानांच्या अपघातांमुळे अमेरिकेने आता आपल्या हवाई दलातील विमानांच्या ताफ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या अमेरिकन एअरफोर्स F-16 सारख्या जुन्या विमानांपेक्षा F-35 सारख्या अत्याधुनिक आणि नव्या पिढीच्या विमानांवर अधिक भर देत असल्याचे बोलले जात आहे.
