नेमकं काय घडलं?
क्रॅन्स-मॉन्टाना हे शहर स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगसाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचे आवडते शहर म्हणून ओळखलं जातं. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका बारमध्ये मोठी पार्टी सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये बारच्या इमारतीतून धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. या आगीत अनेक लोक होरपळले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्वित्झर्लंड सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आणि जंगलातील आगींच्या संकटाचा सामना करत आहे, त्यातच ही भीषण दुर्घटना घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर काही ठिकाणी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.
घटनेनंतर स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. क्रॅन्स-मॉन्टाना हे पर्यटनाचं मुख्य केंद्र असल्याने तिथे नेहमीच मोठी गर्दी असते. मृतांमध्ये स्थानिक लोकांसोबतच परदेशी पर्यटकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
