न फोन, न भेट, जिवंत असल्याचा पुरावाही नाही
कासिम खान यांनी त्यांच्या वडिलांच्या भेटीवर असलेल्या निर्बंधाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "माझे वडील जिवंत असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. मला किंवा माझ्या भावाला वडिलांशी कोणताही संपर्क साधता आलेला नाही." तब्बल ८४५ दिवसांपासून इम्रान खान कैदेत आहेत आणि गेल्या सहा आठवड्यांपासून त्यांना एकांतवासात ठेवण्यात आलं असल्याचा आरोप कासिम यांनी केला आहे. न्यायालयाने परवानगी दिली असूनही इम्रान खान यांच्या बहिणींना त्यांना भेटू दिले जात नाही.
advertisement
हिटलरशाही सुरू असल्याचा आरोप
इम्रान खान यांची बहीण नूरिन नियाझी यांनीही पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानच्या सरकारची दडपशाही हिटलरशाही सुरू आहे. कोर्टाची परवानगी असतानाही भेटू दिलं जात नाही. कोणतीही माहिती दिली जात नाही. नूरिन यांच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात काय चाललं आहे याची माहिती देखील कुणालाच दिली जात नाही. जेल मॅन्युअलनुसार चार दिवसांपेक्षा जास्त एकांतवासात ठेवता येत नसतानाही त्यांना ठेवले जात आहे. याआधी पाकिस्तानमध्ये असं कधीच घडलं नव्हतं.
इम्रान खान यांच्या समर्थकांना आणि कुटुंबाला आदियाला जेलबाहेर ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे, त्याबद्दल नूरिन नियाझी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "लहान मुल, वयस्कर व्यक्ती किंवा महिला, असा कोणताही विचार न करता लोकांना मारहाण करण्याची परवानगी देण्यात आली आहे." लोकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. लोकांमध्ये मोठा स्फोट होईल आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील.
इम्रान खान यांच्यावर सुरू असलेल्या कायदेशीर कारवाई आणि त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उप प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे इम्रान खान यांचे मानवाधिकार आणि नियमांनुसार योग्य प्रक्रिया जपले जावेत, अशी मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये न्याय आणि प्रक्रियेतील निष्पक्षता आवश्यक असते, यावर संयुक्त राष्ट्रांनी भर दिला आहे.
