विशेष बाब म्हणजे एक दिवस आधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी लिबियाच्या लष्कर प्रमुखांची भेट घेतली होती. या दोन्ही देशात मोठी डीलही झाली होती. मात्र या डीलच्या दुसऱ्याच दिवशी लिबियाच्या लष्कर प्रमुखांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
लिबियाच्या लष्कर प्रमुखांचा अपघात कसा झाला?
advertisement
मंगळवारी तुर्कीची राजधानी अंकारा येथून लिबियाचे लष्करप्रमुख, इतर चार अधिकारी आणि तीन क्रू मेंबर्सना घेऊन एका खासगी विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं. ज्यामध्ये विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला, असं लिबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितलं की लिबियाचे शिष्टमंडळ तुर्की आणि लिबियामधील लष्करी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय बैठकीसाठी अंकारामध्ये आलं होतं.
लिबियाच्या पंतप्रधानांनी पुष्टी केली
लिबियाचे पंतप्रधान अब्दुल-हमीद दबेबा यांनी लष्करप्रमुख जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद आणि चार अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी फेसबुकवरील एका निवेदनात म्हटलं की, लिबियाचं शिष्टमंडळ घरी परतत असताना हा दुःखद अपघात झाला. यामुळं लिबियाचं मोठं नुकसान झालं आहे. अल-हद्दाद हे पश्चिम लिबियातील सर्वोच्च लष्करी कमांडर होते आणि त्यांनी लिबियन सैन्याला एकत्र करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
लिबियाच्या लष्करप्रमुखांच्या विमानाचा संपर्क तुटला अन्...
तुर्की अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंकाराच्या दक्षिणेस सुमारे ७० किलोमीटर (सुमारे ४३.५ मैल) अंतरावर असलेल्या हायमाना जिल्ह्यातील केसिकावाक गावाजवळ फाल्कन ५० प्रकारच्या बिझनेस जेटचे अवशेष सापडले. मंगळवारी संध्याकाळी, तुर्की हवाई वाहतूक नियंत्रकांनी सांगितले की अंकाराच्या एसेनबोगा विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लिबियाला परतणाऱ्या विमानाशी त्यांचा संपर्क तुटला.
मुनीरच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी अपघात
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर लिबियात पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा अपघात झाला आहे. एक प्रकारे पाकिस्तान लिबियासाठी बॅडलक ठरला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अलीकडेच लिबियाचा अधिकृत दौरा केला. या भेटीदरम्यान त्यांनी बेनगाझी येथे लिबियन नॅशनल आर्मी (LNA) चे कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल खलिफा हफ्तर आणि त्यांचे डेप्युटी सद्दाम खलिफा हफ्तर यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकिस्तान आणि लिबियाने एक मोठा संरक्षण करार केला. या करारांतर्गत, पाकिस्तान लिबियाला त्यांचे लढाऊ विमान पुरवणार आहे.
