झुंझुनूं : सध्या दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जात आहे. मात्र, यातच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. आहे. दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना एका 13 वर्षांच्या मुलाच्या खिशातच फटाका फुटला. या घटनेत दुर्दैवाने या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
हिमांशू असे या 13 वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. हिमांशूने फटाके फोडण्यासाठी सल्फर आणि पोटॅशचे मिश्रण तयार केले. हे मिश्रण त्याने काचेच्या बाटलीत टाकून खिशात ठेवले. दुर्दैवाने खिशात ठेवलेली काचेची बाटलीचा स्फोट झाला आणि या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने जयपूर येथील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. हिमांशू हा झुंझुनूं जिल्ह्यातील सूरजगडमधील वॉर्ड क्रमांक 14, राजपूत कॉलनीत राहत होता. 21 दिवसांनी त्याच्या बहिणीचे लग्न आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेने दिवाळीच्या सणावर या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
advertisement
ऑनलाइन गेमिंगचा नाद, अल्पवयीन मुलानं आपल्याच घरात केली 40 लाखांची चोरी, धक्कादायक घटना
हिमांशुची आई रेखा यांनी सांगितले की, हिंमाशुने त्यांच्याकडून 100 रुपये घेतले होते. ज्यूस पिऊन चॉकलेट घेऊन येईन, असे त्याने सांगितले होते. पण पैसे घेतल्यावर हिमांशुने 50 रुपयांचे पोटॅश आणि 50 रुपये किमतीचे सल्फर विकत घेतले. तसेच ते मिक्सरमध्ये काढून काचेच्या बाटलीत भरले. या दरम्यान, या बाटलीचा स्फोट झाला. त्याच्या बहिणीने त्याला हे सर्व करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ऐकले नाही आणि यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. जोरात स्फोट झाल्याने हिमांशूच्या पायाला जबर दुखापत झाली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
तज्ज्ञ काय म्हणाले -
फटाके फोडण्याबाबत डॉ.संदीप पाचर यांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, मुलांना उघड्यावर फटाके फोडू देऊ नयेत. तसेच त्यांना फटाके बनवण्याचे साहित्य देऊ नये. दुर्दैवाने कोणतीही घटना घडल्यास ताबडतोब जवळच्या रुग्णालयात धाव घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.